पुणे : महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या मेट्रोपोलियन सिटीमध्ये पुण्याचा (Pune) समावेश आहे. त्यामुळे, पुणे शहरातील नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि तेथील प्रश्नांना कायम प्राधान्याने नेतेमंडळीही स्थान देतात. त्यातच, गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे पुणे शहर राज्यात चर्चेत आहे. पुणे पोर्शे कार हीट अँड रन, तरुणाईचा ड्रग्ज आणि पब्जच्या विळख्यात अडकेला पाय, यामुळे पुणे पोलिसांच्याही रडावर आहे. तर, आता पुणे शहरात आज चक्क बिबट्याचे दर्शन घडल्याने पुणेकरांच्या सर्वसामान्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वी पुण्यात रानगवा आल्यामुळे पालिका प्रशासन व वन विभाग खडबडून जागे झाले होते. आता, चक्क बिबट्याने (Leopard) महावितरण कार्यालयात हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर, काहींनी बिबट्याला वाहून भुवयाही उंचावल्या होत्या. 


पुण्याच्या राजगुरुनगर येथील महावितरण कार्यालयात भरदुपारी बिबट्या शिरल्याने कार्यालयातील सर्वांचीच घाबरगुंडी झाली. विशेष म्हणजे कार्यालय कामकाज सुरू असतात बिबट्या कार्यालयात घुसल्याने कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अनेक कर्मचारी आपलं कार्यालय सोडून बाहेर पळाल्याचं पाहायला मिळालं. येथील महावितरण कार्यालयातील मीटर टेस्टिंग विभागात महिला कर्मचारी काम करता असताना बिबट्याची एन्ट्री झाली होती. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. 


महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ वनविभागाला पाचारण करण्यात आलं होतं, बिबट्या कार्यालयात आल्याची माहिती देण्यात आल्यानंतर वन विभागाने घटनास्थळी धाव घेत मोठ्या मेहनतीने बिबट्याला जेरबंद केलं. तत्पूर्वी बिबट्याला पाहण्यासाठी महावितरण कार्यलयात गर्दी केलेल्या नागरिकांनी बिबट्याला पाहून एकमेकांची चांगलीच मजा घेतली. तसेच, ये पुढे जाऊ नका तो जंप मारंल, ऐ लय मोठा हाय की.. असा संवाद तेथील नागरिकांचा ऐकू येतो. 


Video : https://youtube.com/shorts/EojeNFk4GMk?feature=shared 


दरम्यान, बिबट्याचा वावर मानवी वस्तीत चांगलाच वाढला असून सातत्याने या ना त्या भागात बिबट्याचे दर्शन घडत आहे. काही महिन्यांपूर्वी करमाळा, अहमदनगर, कर्जत-जामखेड या भागातही बिबट्याच्या वावरामुळे नागरिक त्रस्त झाले होते. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार हेही  हाती दांडके घेऊन रात्रीची गस्त घालताना दिसून आले होते. माणसं वन्य प्राण्यांच्या जंगलात अतिक्रमण करत असतील, तर वन्य जीवदेखील तुमच्या घरात राहायला येतील, असं नेहमीच बोललं जातं. त्यामुळे, वन, जंगल परिसरातून बिबट्या, रानगवा, हरणं, कधी लांडगा असे प्राणी मानवी वस्तीत प्रवेश करताना पाहायला मिळते.


हेही वाचा


फरफटत नेलंय, त्याला सोडायचं नाही; पीडित कुटुंबातील बाप लेकीने आदित्य ठाकरेंसमोर टाहो फोडला