पुणे : EWS चा जीआर काढून महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची मागणी यावेळी या नेत्यांनी केली. पुण्यातील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला विकास पासलकर, श्रीमंत कोकाटे, राहुल पोकळे, राजेंद्र कुंजीर उपस्थित होते.


महाविकास आघाडीने वैध मराठा आरक्षणाचा खून केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे नेते श्रीमंत कोकाटे यांनी केला आहे. राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेला येणार असल्याचं आधी सांगितलं होतं. पण ऐनवेळी ते आले नाहीत. या वेळी बोलताना श्रीमंत कोकाटे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ज्या ईडब्लूएस आरक्षणाची मागणी केलेलीच नव्हती ते आरक्षण देऊन महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. पाठीत खंजीर खुपसला आहे. ईडब्लूएसमध्ये बहुतांश मराठा समाज येत नाही." तसेच यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. "मुख्यमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री हे सर्व समाजाचे असतात. मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये होऊ देणार नाही, असं विजय वडेट्टीवार नेहमी बोलतात. पण वडेट्टीवार हे न्यायालय आहेत का? वडेट्टीवार हे मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावत आहेत."


अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी


अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. EWS आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. EWS मुळे आरक्षण न मिळाल्यास अशोक चव्हाण जबाबदार असतील. मराठा उपसमितीचा चव्हाण यांनी तातडीने राजीनामा द्यावा. वडेट्टीवार आणि भुजबळ यांनी समतेची शपथविसरली, एकाच जातीसाठी त्यांचा लढा आहे. राज्यपालांकडे वडेट्टीवार आणि भुजबळ यांची तक्रार करणार असून राजीनामा न दिल्यास तीव्र त्यांच्या घरासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.