पुणे: विधानपरिषदेतील पाच आमदारांच्या जागांवर येत्या 27 मार्चला निवडणूक होणार आहे. यात अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा मिळणार आहे. या एका जागेवर अजित पवारांचे पिंपरी चिंचवडमधील खंदे समर्थक नाना काटेंनी दावा केला आहे. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी मागे घेताना मला पुढे संधी दिली जाईल, असा शब्द अजित दादांनी दिला होता. हा शब्द अजित दादा या विधानपरिषद निवडणुकीत पाळतील आणि मला उमेदवारी देतील, असं म्हणत काटेंनी या जागेवर दावा केला आहे. तसेच मी बंडखोरी मागे घ्यावी यासाठी आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माझ्याशी संवाद साधला होता आणि तुम्ही भाजपच्या शंकर जगतापांसाठी माघार घ्या, आम्ही भविष्यात तुमच्यासाठी कुठं तरी कामी येऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याची आठवण करुन देत, आता तो क्षण आणि तो दिवस या विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आल्याचं काटे म्हणाले आहेत. तसेच यावेळी आमदार शंकर जगताप ही माझ्यासाठी शब्द टाकतील आणि विधानसभेची परतफेड करतील अशी अपेक्षा ही काटेंनी बोलून दाखवली आहे. 


नेमकं काय म्हणाले नाना काटे?


एबीपी माझाशी बोलताना नाना काटे म्हणाले, अजित पवार यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी सांगितलं, मी दोन दिवसात तुला भेटायला येतो. त्या पद्धतीने दादा घरी आले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा जेव्हा भाजपाला गेली. त्यावेळी मी अजित दादांची बोललो असताना त्यांनी सांगितलं, आपण महायुतीमध्ये आहोत. त्यामुळे आता तू माघार घे. आपण जे काही असेल ते पुढे पाहू. ज्याप्रकारे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. दोन आमदार विधान परिषदेवर घेतलेले आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती पाहता ज्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अजून एक आमदार पाहिजे. आम्ही सर्व पक्षाचे नगरसेवक आणि नेत्यांनी माझ्यासाठी सहीची मोहीम राबवली आहे. त्यासंबंधीचे लेटर देखील तयार केले आहे. परंतु आत्ता अधिवेशन चालू असल्याकारणाने अजितदादांची भेट होत नाही. अजित दादांना मी निरोप दिलेला आहे. आम्ही सर्वजण ते पत्र घेऊन, निवेदन घेऊन अजित पवार यांना भेटणार आहोत असे माहिती नाना काटे यांनी दिली आहे. 


विधानसभा निवडणुकीवेळी शंकर जगताप यांच्या उमेदवारीसाठी नाना काटे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चर्चा केली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यावेळी कॉल केला होता आणि सांगितलं होतं. नानाभाऊ आता तुम्ही आमच्यासाठी माघार घ्या, नक्कीच आम्ही भविष्यात तुम्हाला कुठे तरी कामी येऊ. तो दिवस आणि तो क्षण आता आलेला आहे, त्यांनी देखील मला मदत करतील, अशी मला अपेक्षा आहे असेही त्यांनी म्हटले आहे. मी महायुती धर्म पाळून काम केले आहे. आता त्यांनी कसा धर्म पळायचा ते त्यांनी ठरवावं. 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. या पाच विधान परिषदेमध्ये एक जागा अजित पवार गटाला मिळणार आहे, त्या जागेवरती मला उमेदवारी मिळावी अशी इच्छा नाना काटे यांची आहे. अजित पवार याबाबत काही निर्णय घेतात आणि नाना गट यांना यावेळी संधी मिळणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


1 जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 100 पेक्षा जास्त अर्ज


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधानपरिषदेची जागा पदरात पाडून घेण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी सुरू झाली आहे. आमदारांमधून 1 तर राज्यपाल कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या 1 जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून मात्र अद्याप कोणाच्याच नावावर शिक्कामोर्तब नाही. विधी मंडळातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 4 अर्ज नेण्यात आले असून येत्या दोन दिवसांत नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.