पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटीलला मदत करण्यात(Lalit Patil Drug Case)  येरवडा कारागृह प्रशासन देखील सहभागी असल्याचं समोर आलं आहे. कारण येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने लिहलेलं एक पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. तीन जून 2023 च हे पत्र ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना उद्देशून लिहण्यात आलं आहे. या पत्रात उघड झालेल्या माहितीमुळे मोठी खळबळ उडाली आहे तर अनेकांचे धाबे दणाणले आहे.


येरवडा कारागृहाचे प्रशासन ललित पाटील प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात 



या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती करून घेण्याची आणि किमान 15 दिवस त्याला तिथंच ठेवण्याची विनंती करत आहेत. त्यासाठी ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पुन्हा येरवडा कारागृहात नेण्यासाठी एस्कॉर्ट उपलब्ध नसल्याच कारण येरवडा कारागृह प्रशासनाकडून देण्यात आलंय. या पत्रच्या माध्यमातून ललित पाटीलला येरवजा कारागृहातील प्रशसन मदत करत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आधी पोलीस , त्यानंतर ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि आता येरवडा कारागृहाचे प्रशासन ललित पाटील प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलंय.


पत्रात नेमकं काय ?


3 जून 2023 ला लिहलेल्या या पत्रामध्ये ललित पाटीलला ससून रुग्णालयात भरती करून घेण्याची आणि किमान 15 दिवस तिथेच ठेवण्याची विनंती करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातून पुन्हा येरवडा कारागृहात ने-आण करण्यासाठी एस्कॉर्ट म्हणजे वाहनांचा प्रश्न असल्याच कारण त्यासाठी देण्यात आलं आहे.  तर येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना लिहिलेले हे पत्र असून या पत्रावर येरवडा कारागृहाच्या कारागृह अधीक्षकांची सही देखील आहे. 


ललित पाटीलला कोणाचा वरदहस्त?


ऑक्टोबर 2020 मध्ये चाकण पोलिसांनी मेफेड्रोन तयार करून त्याची विक्री करणारी टोळी अटक केली. यातील ललित पाटील आणि अरविंद लोहारे या दोन आरोपींनी येरवडा कारागृहात बंद असतानाच नाशिकमध्ये पुन्हा मेफेड्रोनचा कारखाना सुरु करायचं ठरवलं, अशी माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली. एबीपी माझाच्या हाती लागलेलं हे पत्र पोलिसांच्या या माहितीला पुष्टी देणारं आहे. कारण येरवडा कारागृहातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून ललित पाटीलला मोबाईल फोनवर बोलण्याची संधी उपलब्ध होत होती. त्यांनाच हाताशी धरून ललित पाटीलने स्वतःची रवानगी ससून रुग्णालयात करून घेतली. 


पुणे पोलीस अॅक्टिव्ह मोडवर...


ससून रुग्णालयात डॉक्टराची आणि पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांची ललितला मदत मिळाली. त्यातील नाथा काळे आणि अमित जाधव या दोन पोलिसांना अटक करून त्यांना पोलीस दलातून बडतर्फ देखील करण्यात आलं आहे. तर वैद्यकीय शिक्षण विभागाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर ससूनचे डीन डॉ. संजीव ठाकूर यांना पदमुक्त तर डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित करण्यात आलं आह . पण आता पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयातील कोणाकोणाची ललित पाटीलला मदत मिळत होती याची चौकशी करायचं ठरवलं आहे. 


कोणाकोणाची चौकशी होणार?


सुरुवातीला कैद्यांच्या 16 नंबर वॉर्डमध्ये काम करणाऱ्या नर्सेसची चौकशी करण्यात येणार असून त्यानंतर महेंद्र शेवते या ससूनमधील क्लार्कची चौकशी होण्याची शक्यता आहे. महेंद्र शेवते हा ललिताचा ससूनमधील मुक्काम वाढावा यासाठी प्रयत्न करत असल्याचा संशय आहे. ससूनच्या व्यवस्थापनाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून चार सदस्यीय समिती नेमण्यात आली होती . पुणे पोलीस हा अहवाल मागवणार असून त्या अहवालातील माहिती स्वतःच्या तपसासोबत पुणे पोलीस पडताळून पाहणार आहेत. त्यानंतर ससूनच्या व्यवस्थापनातील काही जणांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.


कारवाईची प्रतिक्षा... 


 ललित पाटीलसह या प्रकरणात 13 आरोपींना अटक करून त्यांच्यावर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे तर दोन पोलिसांना देखील बडतर्फ करून अटक करण्यात आलं आहे. पण येरवडा कारागृहातून निघून ससूनमध्ये महिनोंमहिने ठाण मांडून ललित पाटील मेफेड्रोन विक्रीचे रॅकेट ज्यांच्या मदतीने चालवू शकला त्या कारागृहातील अधिकाऱ्यांवर आणि ससूनमधील अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? हा या प्रकरणातील पुढचा प्रश्न असणार आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Lalit Patil Drug Case : ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; येरवडा कारागृह प्रशासनाकडून ललित पाटीलला मदत, Exclusive पत्र एबीपी माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय?