पुणे : ड्रग माफिया ललित पाटील नेमक्या कोणत्या  (Sasoon Hospital Drug Racket)  डॉक्टरच्या शिफारशीवरुन ससून रुग्णालयात पाहूणचार घेत होता आणि त्याच्यावर नेमके कोणते डॉक्टर उपचार करत होते, याची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. ससून रुग्णालयातील डीन डॉ. संजीव ठाकूर यांनी या संदर्भात माहिती देताना उडवाउडवीचे उत्तरं दिले होते. मात्र स्वत: डीन ठाकूर हेच ललित पाटीलवर उपचार करत असल्याचे आरोपींच्या रजिस्टरवर नोंद आहे. त्यामुळे मागील काही महिने ललित पाटीलचा पाहूणचार थेट डॉ. संजीव ठाकूर करत असल्याचं सिद्ध झालं आहे. 


ड्रग माफिया ललित पाटीलवर ससुन रुग्णालयातील उपचार नक्की कोणत्या डॉक्टरांनी केले, याची माहिती देण्यास आजपर्यंत ससुनचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनी आजतागायत नकार दिला. पत्रकार असतील,  विभागीय आयुक्त असतील किंवा राजकीय नेते असतील डॉक्टर संजीव ठाकूर यांनी गोपनीयतेच्य नावाखाली ही माहिती आजतागायत कोणालाच दिलेली नाही. मात्र, ससूनमधे उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या आरोपींचे रजिस्टर एबीपी माझाच्या हाती लागले आहे. या रजिस्टरमध्ये उपचार घेणाऱ्या आरोपी रुग्णाचे नाव, त्याच्यावर कोणत्या आजारांवर उपचार सुरु आहेत, त्या आजाराचे नाव आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाची सुरुवातीचे अक्षरं लिहिण्यात आले आहेत. 


दरम्यान, या रजिस्टरमधील नोंदीनुसार ललित अनिल पाटील याच्यावर हर्नियाच्या आजारासाठी उपचार सुरु होते आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव एस. एस. टी. आहे. मात्र, हे डॉ. एस. एस. टी. हे दुसरे तिसरे कोणी नसून ससूनचे डीन डॉक्टर संजीव शामराव ठाकूर हे स्वतःच आहेत.  त्यामुळे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांच्याच शिफारशीवरून ललित पाटील ससूनमधे तळ ठोकून होता हे सिद्ध होत आहे. 


आमदार धंगेकरांना दिली होती उडवाउडवीची उत्तरं....


ससूनमधील हे प्रकरण बाहेर आल्यानंतर आणि ललित पाटील पळून गेल्यानंतर डॉ. संजीव ठाकूर काही दिवस बाहेरगावी होते. माध्यामांनी विचारल्यावर त्यांनी पुण्यात आलो की माहिती देईन असं सांगितलं होतं. त्यानंतर काही दिवसांत ते पुण्यात आले मात्र माध्यमांशी फार काही बोलायला तयार नव्हते. आमदार धंगेकरांनीदेखील ससूनमध्ये जाऊन त्यांना या प्रकरणाची विचारपूस केली होती. मात्र त्यावेळी चौकशी करुन सांगतो. पोलीस आणि डॉक्टरांमधील ही माहिती असते ती उघडपणे सांगता येत नाही आणि मला वॉर्डनंबर 16 ची फार काही माहिती नाही, अशी उत्तरं दिली होती. मात्र ललितवर स्वत: डॉ. संजीव ठाकूर करत असल्याचं या नोंदी असलेल्या रजिस्टरमधून समोर आलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Lalit Patil Drugs Case : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट प्रकरण; मुंबई पोलिसांकडून आणखी एका आरोपीला अटक