पुणे : पारोडी फाटा येथे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्थानिक महिला भगिनी आणि नागरिकांच्या आग्रहास्तव आज दिवसभर मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) ठेवलेले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. आज दिवसभर काहीही न खाता आमदार रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा ( (Yuva Sangharsha Yatra) )अविरतपणे सुरू ठेवत तब्बल 18 किमी ठरल्याप्रमाणे पायी प्रवास करत मुक्कामाचे ठिकाण गाठले. विशेष म्हणजे दिवसभर तोच उत्साह कायम ठेवत नागरिक, युवा व महिलांशी त्यांनी संवाद साधला आणि चर्चा केली. अखेर रात्री उशिरा नागरिकांनी त्यांच्यासाठी घरून आणलेल्या डब्ब्यातून जेवण करण्यासाठी केलेल्या आग्रहास्तव त्यांनी अन्नग्रहण केले.
अन्नत्याग आंदोलनाची केली होती घोषणा
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक दिवस अन्नत्याग करणार असल्याची घोषणा केली होती. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsha Yatra) शुक्रवारीही शिरूर तालुक्यातच असणार आहे, त्या दरम्यानही त्यांनी अन्नत्यागाचा निर्णय घेतला होता. सणसवाडी येथील एका जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली होती.
आमदार रोहित पवार म्हणाले होते की, जरांगे पाटील आज उपोषणाला परत बसले आहेत. आमची युवा संघर्ष यात्रा युवकांच्या हिताची आहे. युवकांना आज नोकऱ्या मिळत नाहीत, शिक्षण महाग होतंय, बेरोजगारी वाढतेय. एक सामाजिक कार्यकर्ता जर उपोषण करत असेल तर सरकारने पुढाकार घ्यावा. जर तुम्ही घटना दुरूस्ती करू शकता तर मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण का देऊ शकत नाही? या समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण द्यायला पाहिजे, वारंवार कोणीतरी कोर्टात जाऊन त्याला आव्हान देऊ शकणार नाही याकडे लक्ष दिलं पाहिजे.
असा आहे युवा संघर्ष यात्रेचा प्रवास
युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आमदार रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा ही 800 किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला 18 ते 20 किलोमीटरचा प्रवास असेल. पहिला टप्पा 11 किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण 45 दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या यात्रेला सुरुवात होऊन काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव, नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप 7 डिसेंबर रोजी होणार आहे.