पुणे : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही व्हॅक्सीन बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. कोरोनावरील लसीची निर्मिती इथं मे महिन्यापासून सुरू आहे. लस निर्मितीची हीच प्रक्रिया समजून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. ही सीरम इन्स्टिट्यूट आणि ती स्थापन करणारे सायरस पुनावाला यांच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकुयात.
शरद पवारांचे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधील वर्गमित्र असलेल्या सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला.
सीरम इन्स्टिट्यूटकडून पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवरती ज्या लसींचा उपयोग केला जातो त्यापैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झालाय.
पंतप्रधान मोदी आज पुण्यात, सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार
कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना एप्रिल महिन्यात प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं. कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता.
पुढं ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता अदर पुनावाला पाहतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलंय. ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे. पुनावाला आणि त्यांची सीरम इन्स्टिट्यूट स्वच्छता, आरोग्य आणि बाल संगोपन यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी सामाजिक जाणिवेतून खर्च करत असतात.