पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं होतं.


पीएमओने केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया मध्ये भेट देणार आहेत.


एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता अहमदाबादमध्ये भेट देतील त्यानंतर ते दुपारी 1.30 पर्यंत भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात Serum Institute ला ते 4:30 वाजता भेट देतील अशी माहिती आहे.


पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे.  त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत.


पंतप्रधानांचा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 नोव्हेंबर रोजी सर्वाधिक  कोरोना संक्रमित आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हरियाणा, गुजरात, दिल्ली या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाची वर्तमान स्थितीची माहिती तसेच कोरोना लस वितरणासंदर्भातील तयारीबाबत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.


 लसीच्या मुद्द्यावरुन राजकारण करू नका - पंतप्रधान 


कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.


लस वितरणासंदर्भात राज्यात टास्क फोर्स स्थापन


महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली होती. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असंही ते म्हणाले होते.