Kiran Gosavi Arrested : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आर्यन खानसोबतच्या सेल्फीमुळे वादात आलेल्या किरण गोसावीवर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप किरण गोसावीवर आहे. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर किरण गोसावीच्या चौकशीतून काय-काय गौप्यस्फोट होतात, यावर आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.


प्रभाकर साईलच्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी दावा केला आहे की, किरण गोसावीनं (Kiran Gosavi) सरेंडर केलेलं नसून आम्ही आमच्या इंटलिजेंसच्या आधारे त्याला अटक केली आहे.  प्रभाकर साईल (Prabhakar Sail) आर्यन खानला ज्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलं आहे, त्या मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drug Case) प्रकरणातील पंच आहे. तर दुसरा पंच असलेल्या किरण गोसावीचा बॉडिगार्डही आहे. प्रभाकर साईलनं माध्यमांसमोर येत गौप्यस्फोट केल्यापासूनच किरण गोसावी फरार होता. तो लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त सकाळी 11 वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. 


पुण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई 


पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचे वादग्रस्त पंच किरण गोसावीला पुण्यात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील एका लॉजमध्ये पहाटे 3.30 वाजता ताब्यात घेण्यात आलं. तसेच पुण्यात दाखल करण्यात आलेल्या फसवणूकीच्या गुन्ह्यातंर्गत अटक करण्यात आली आहे. किरण गोसावीनं नोकरीचं अमिष दाखवून फसवणूक केली होती. मागील काही दिवसांपासून किरण गोसावीचा अनेक राज्यांमध्ये वावर होता. अशातच किरण गोसावीचा ताबा जर इतर यंत्रणांनी मागितला तर प्रक्रिया केली जाईल, असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं. 


पंच प्रभाकर साईल यांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणातील दुसरे पंच आणि साधीदार किरण गोसावी याची अटक अटळ होती. पुणे पोलिसांचं पथक गोसावीला अटक करण्यासाठी लखनौला रवाना झालं होतं. गोसावीवर आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांच्या तापासासाठी पोलीस त्याचा शोध घेत होते. फसवणूक प्रकरणी गोसावीविरोधात पुणे पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे. सोमवारी सायंकाळी गोसावीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये तो सरेंडर करण्यासाठी लखनौ पोलिसांकडे गेल्याची माहिती मिळाली होती. मात्र लखनौ पोलिसांनी गोसावीला अटक करुन घेण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जात होतं. इतर ठिकाणी सरेंडर होण्याचा सल्ला लखनौ पोलिसांनी दिला होता. गोसावी लखनौमध्ये आहे, हे समजताच पुणे पोलिसांचं पथक रवाना झालं आहे. त्यामुळे आता गोसावीची अटक निश्चित मानली जात आहे.  


रविवारी प्रभाकर साईल यांनी एबीपी माझाला मुलाखत देताना अनेक गौप्यस्फोट केले. त्याच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यानंतर किरण गोसावीची एक व्हायरल क्लिप समोर आली होती. यामध्ये तो लखनौ पोलिसांना मला सरेंडर व्हायचंय, असं म्हणत असल्याचं कळत होतं. तर पोलीस अधिकारी सरेंडर करून घेण्यास गोसावीला स्पष्टपणे नकार देत असल्याचं ऐकायला येतं होतं. इथे का सरेंडर करायचं आहे? असा प्रश्न पोलीस अधिकारी गोसावीला विचारत होते. आपल्याला येथील पोलीस स्टेशन जवळ आहे, यामुळे सरेंडर करायचं आहे, असं गोसावी त्या संबधित अधिकाऱ्याला म्हणत होता. तर इथे सरेंडर करून घेणार नाही, दुसरीकडे जा, असं सांगत पोलीस अधिकारी किरण गोसावीला नकार देताना ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. 


गोसावी लखनौमध्ये असल्याचं समजताच पुणे पोलिसांचं पथक तात्काळ रवाना झालं होतं. मुंबईतील क्रूझवरील अंमली पदार्थ पार्टी प्रकरणात पंच आणि साक्षीदार राहिलेल्या गोसावी याच्या विरोधात फसवणूक प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याप्रकरणी पुणे पोलीस त्याला अटक करण्यासाठी रवाना झाले होतं. 


क्रूझ ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी चर्चेत


क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात किरण गोसावीने आर्यन खानला सोडवण्याच्या बदल्यात शाहरूख खानकडून 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्याचा पंच प्रभाकर साईल यानं केला आहे. तसेच किरण गोसावीवर पुण्यामध्ये गुन्हे नोंद असून गेले बरेच दिवस पुणे पोलीस त्याच्या शोधात होते.