Pune Crime news :  पुण्यात शेतात (opium poppies)  गांजाची लागवड (Pune crime) केल्याच्या बातम्या आजपर्यंत आपण पाहिल्या आहेत. आता मात्र शेतात अफूची लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याजवळील  होळकरवाडी येथे  दोन शेतकऱ्यांनी आपल्या गव्हाच्या शेतात अफुची लागवड केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 शेतकऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. राजाराम दामोदर होळकर, बाळू किसन कटके अशी या दोघांची नावं आहेत. लोणी काळभोरच्या पोलिसांना होळकरवाडी परिसरामध्ये ओढ्यालगत असलेल्या शेतामध्ये काही शेतकरी अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने गव्हाच्या शेतामध्ये अफूच्या पिकाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई केली आणि  11 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  होळकरवाडी येथील चिमणी तलाव परिसरात पोलिसांनी विशेष पथकाला अफू या पिकाची लागवड झाल्याचे दिसून आले. त्यानुसार या पथकाने अफुची शेती नष्ट केली आणि  11 लाख 60 हजार रुपये किमतीच्या 116 किलोग्रॅम वजनाची अफुची 1 हजार 374 झाडे जप्त केली आहेत. 


पुरंदर तालुक्यातील सुप्यातदेखील अफुची शेती


दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सुपे येथे अफूची शेती करण्याऱ्यावर कारवाई करण्यात आली होती. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई केली होती. पोलिसांनी कारवाई करून अफूची बोंडे जप्त केली. अफुच्या बोंड्यांचं एकूण वजन 33  किलो 200 ग्रॅम अफू मिळाला. त्याची किंमत प्रति किलो 2000 रुपये दराने 44 हजार 400 रुपये आहे.  मयूर उत्तम झेंडे असे शेतकऱ्याचं नाव आहे. पोलिसांना या अफुच्या शेतीची माहिती मिळताच पोलिसांनी पाहणी सुरु केली होती. रात्रीपर्यंत पोलीस शोध घेत होते. मक्याच्या पिकात शेतकऱ्याने अफुची लागवड केल्याचं समोर आलं होतं. 


अफुची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसता. पैशासाठी हा शेतकऱ्याचा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफुच नाही तर गांजाची लागवड केल्याचेदेखील प्रकार अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफुची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते.