Kalyani Nagar Pune Accident : कल्याणी नगर अपघाताप्रकरणी (Kalyani Nagar Pune Accident) आता येरवडा पोलिस ठाण्यात त्यावेळी कार्यरत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची देखील चौकशी होणार आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या नेतृत्वाखालील  समिती येरवडा पोलिसांची चौकशी करणार आहे. दोन एफआयआर का नोंद करण्यात आल्या? कोणी दबाव आणला का?  त्या अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी कधी करण्यात आली?  इत्यादी गोष्टींचा तपास होणार आहे. 


अग्रवाल पिता-पुत्रांच्या जबाबात तफावत 


गुरुवारी सकाळपासून अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवाल (Vishal agarwal) आणि त्याचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी समोरासमोर बोलावलं होतं. दोघांची कसून चौकशी करण्यात आली. अल्पवयीन मुलाची वागणूक, या घटनेआधी तो कसा वागायचा? एकूण त्याच्या लाईफस्टाईल बद्दल काही प्रश्न देखील या दोघांना विचारण्यात आले. मात्र, दोघांच्या उत्तरांमध्ये तफावत जाणवली आहे. दरम्यान, आता अल्पवयीन मुलासोबत असलेल्या इतर दोन अल्पवयीन मुलांच्या पालकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे. 


अल्पवयीन आरोपीच्या नावाने फेक व्हिडीओ व्हायरल 


अल्पवयीन आरोपीच्या नावाने एका तरुणाने चक्क रॅप साँग तयार केलं आणि शिवीगाळ करणारं रॅप साँगचा सेल्फी व्हिडीओ स्वत: शूट केलं. या रॅप साँगमध्ये प्रचंड शिवीगाळ तर आहेच, पण चीड, संताप, येईल असे शब्द त्याने उच्चारले. त्यामुळे पुणे पोलिसांनाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले.  हा व्हिडीओ डीपफेक आहे का, एआयच्या वापर करून तो तयार करण्यात आला आहे का याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आले. 


पोलीसांसह राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप


विशाल अग्रवालच्या (Vishal agarwal) मुलाला पैसा, पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळे जामीन मिळाल्याचा आरोप राज्यातील काही नेत्यांकडून करण्यात येत होता. सोशल मीडियावरही या प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात येत होता. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करुन मदत केल्याचे आरोप करण्यात येत होते. मात्र, सुनील टिंगरे यांनी हे आरोप नाकारले होते.  त्यामुळे राज्यभरातील पुणे अपघात प्रकरणावरुन संताप व्यक्त केला जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Kalyani Nagar Pune Accident : पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, आरोपीच्या वडिल-आजोबांच्या जबाबात तफावत, पालकांसह पोलिसांचीही चौकशी होणार