पुणे : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri News) खंडोबा देवस्थानच्या विश्वस्त पदाचा वाद थांबायचं नाव घेत नाहीय. ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर जेजुरीतील ग्रामस्थ  अजित पवारांची भेट घेणार आहेत. तर उद्या जेजुरीकर विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विश्वस्त पदाचा वाद हा चिघळला होता. मात्र अद्याप या वादावर अजून तोडगा निघत नसल्यानं हे आंदोलन दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसतंय.  


पालकमंत्री आणि प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे : सुप्रिया सुळे


अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरीत  सध्या यळकोट यळकोट जय मल्हारऐवजी निषेधाचा सूर उमटत आहे.  या निषेधाचं कारण नवं विश्वस्त मंडळ आहे. स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना विश्वस्त मंडळात स्थान दिल्याने गावकऱ्यांनी आंदोलनाची हाक देत नाराजी व्यक्त केली आहे. 19 मे रोजी धर्मदाय आयुक्तांनी जेजुरीच्या  सात विश्वस्तांची नेमणूक केली. जेजुरी बाहेरील पाच लोकांची विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे जेजुरीकर आक्रमक झाले. जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा सुरू असलेला वाद हा गंभीर प्रश्न आहे. पालकमंत्री आणि प्रशासनाने मार्ग काढला पाहिजे, त्यांची ती जबाबदारी असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


जेजुरीकर कोर्टात जाणार


 जेजुरीतील ग्रामस्थांनी  ग्रामसभा घेऊन जागरण गोंधळ, रास्ता रोको केला. तसेच रात्री विश्वस्त पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी केली. गावकऱ्यासमोर विश्वस्त मंडळाला काढता पाय घ्यावा लागला. तर जेजुरीत कधी याआधी अशा पद्धतीने चार्ज स्वीकारला गेला नसल्याचे माजी विश्वस्त मंडळाचे म्हणणं आहे.  देव संस्थांनच्या पदी बाहेरील लोकांची निवड झाल्यावर भाजपच्या नेत्या अलका शिंदे यांनी त्यांच्या पुणे प्रभारी पदाचा राजीनामा दिला आहे.मार्तंड देवस्थानच्या भक्त निवास बाहेर गावकऱ्यांनी आंदोलन केले. तसेच धर्मदाय आयुक्त यांच्या निर्णयाच्या विरोधात जेजुरीकर कोर्टात जाणार असल्याचे ग्रामस्थांच्यावतीने सांगण्यात आले आहे.


विश्वस्त मंडळांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात


 जेजुरी गडावरील भाविकांची वाढती संख्या बघता जेजुरी संस्थानाची घटना बदलून 7 ऐवजी 11 जणांची विश्वस्त मंडळाची रचना करावी अशी मागणी जेजुरीकरांनी धर्मदाय आयुक्तांकडे केली आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेराया हा बहुजनांचा देव म्हणून ओळखला जातो. खंडोबा चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून किंवा देशभरातून लाखो भाविक जेजुरीत दाखल होत असतात. परंतु याच जेजुरी संस्थांच्या विश्वस्त मंडळांची नियुक्ती ही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या विश्वस्तांच्या नियुक्तीला पक्षीय किनार असल्याचा देखील आरोप केला जातोय. त्यामुळे आता आक्रमक गावकऱ्यांपुढे प्रशासन नमते का हा खरा प्रश्न आहे.