Jayant Patil on Pune Crime : राज्यात एकाकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गाजत असताना पुणे शहरातील गुन्हेगारी (Pune Crime) विश्वातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील नाना पेठेत काल, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार (Vanraj Andekar Murder) केलाय. तर त्यानंतर त्यांची कोयत्यानं वार करत हत्याही केली आहे. या घटनेत आंदेकर यांच्यावर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. दरम्यान या हल्ल्यात आंदेकर यांचा जागीच मृत्यू झालाय. मात्र, या घटनेमुळं पुणे शहरासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात ही घटना घडली. वनराज आंदेकर 2017 ला रास्ता पेठ, रविवार पेठ वार्ड येथून नगरसेवक झाले होते. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं समोर आलेलं आहे. टोळी युद्ध, वर्चस्वाच्या लढाईतून अनेकांना संपवण्यात आल्याचे प्रकार देखील घडले आहेत. 


दरम्यान, याच मुद्द्याला घेऊन विरोधकांनी सरकावर हणाघात केला असताना पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का?, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारला (Maharashtra Government) केला आहे. एक्स या माध्यमावर ट्विट करत जयंत पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.   


ट्विटमध्ये काय म्हटलंय?


पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल करत पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणावरुन जयंत पाटलांनी  सरकारवर हल्लाबोल केला आहे. 


पुण्यात 25 वर्षांपासून आंदेकर टोळी सक्रीय


वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती.   


वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकरची हत्या


वनराज आंदेकर याची हत्या घरगुती वादातून किंवा वर्चस्वाच्या लढाईतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.  वनराज आंदेकर याची हत्या रात्री नाना पेठेतील डोके तालीम परिसरात साडे आठच्या वेळी घडली. हल्ला झाला त्यावेळी डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर एकटाच तिथे उपस्थित होता. हा हल्ला होण्यापूर्वी परिसरातील लाईट देखील गेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वनराज आंदेकरला केईम रुग्णालयात दाखल केलं, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, आंदेकर टोळीचा पुण्यातील नाना पेठ परिसरावर प्रभाव होता. गेल्या काही दिवसांपासून आंदेकर टोळीचा प्रभाव कमी होत असल्याच्या चर्चा होत्या.


हे ही वाचा