Pune Crime News पुणे : पुण्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचं समोर आलेलं आहे. टोळी युद्ध, वर्चस्वाच्या लढाईतून अनेकांना संपवण्यात आल्याचे प्रकार देखील घडले आहेत. पुणे शहरातील नाना पेठेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले. त्यानंतर पाच ते सहा गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात आंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात ही घटना घडली. वनराज आंदेकर 2017 ला रास्ता पेठ, रविवार पेठ वार्ड येथून नगरसेवक झाला होता. 


 आंदेकर कुटुंब राजकारणात सक्रीय


वनराज आंदेकर यांचं कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील राजकारणात सहभागी असल्याचं पाहायला मिळतं. वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2017 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाला होता. यापूर्वी वनराज आंदेकर यांची आई राजश्री आंदेकर यांनी देखील नगरसेवक म्हणून काम केलं होतं. त्या 2007 आणि 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाल्या होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तर, वत्सला आंदेकर या देखील राजकारणात होत्या त्यांनी पुण्याचं महापौरपद भूषवलं होतं. 



पुण्यात 25 वर्षांपासून आंदेकर टोळी सक्रीय


वनराज आंदेकर याचे वडील बंडू आंदेकरांची टोळी पुण्यातील जुन्या टोळींपैकी एक आहे. आंदेकर टोळी आणि माळवदकर या दोन्ही टोळ्यांमध्ये संघर्ष झाला होता. या टोळीयुद्धातून प्रमोद माळवदकर याचा खून झाला होता. त्या प्रकरणात बंडू आंदेकर याला जन्मठेप झाली होती.   


 वर्चस्वाच्या वादातून वनराज आंदेकरची हत्या 


वनराज आंदेकर याची हत्या घरगुती वादातून किंवा वर्चस्वाच्या लढाईतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.  वनराज आंदेकर याची हत्या रात्री नाना पेठेतील डोके तालीम परिसरात साडे आठच्या वेळी घडली. हल्ला झाला त्यावेळी डोके तालीम परिसरात वनराज आंदेकर एकटाच तिथे उपस्थित होता. हा हल्ला होण्यापूर्वी परिसरातील लाईट देखील गेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वनराज आंदेकरला केईम रुग्णालयात दाखल केलं, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. 


 दरम्यान, आंदेकर टोळीचा पुण्यातील नाना पेठ परिसरावर प्रभाव होता. गेल्या काही दिवसांपासून आंदेकर टोळीचा प्रभाव कमी होत असल्याच्या चर्चा होत्या.


वनराज आंदेकर हत्या प्रकरण



इतर बातम्या :


पाच राऊंड फायर केले, पण एकही गोळी लागली नाही...; मग वनराज आंदेकरांचा मृत्यू नेमका कसा झाला?, मोठी माहिती समोर


कोयता-बंदुका घेऊन 14-15 जणांची गँग आली, काही कळायच्या आत वनराज आंदेकरांना घेरलं, अंगावर काटा आणणारं CCTV फुटेज