Pune Open Book Laibrary : सध्याची तरुणाई वाचन करत नाही अशी तक्रार अनेक लोक करत असतात. हीच वाचन संस्कृती लोप पावू नये, म्हणून पुण्यातील तरुणाई समोर आली आहे. तरुणांनी वाचन संस्कृती जपण्यासाठी ओपन बुक चळवळ सुरु केली आहे. ही ओपन बुक चळवळ आता राज्यभर काम करत आहे. पुण्यात शिकणारी प्रियंका चौधरी हिने काही वर्षांपूर्वी ही ओपन बुक चळवळ सुरु केली आहे. याच प्रियंकाला आता राज्यभर 'लायब्ररी गर्ल' म्हणून ओळखलं जातं.
प्रियंका मूळची विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील आहे. ग्रामीण भागात शिक्षणाचीच फार सोय नसते. त्यामुळे अवांतर वाचनाचा प्रश्न उभाच राहत नाही. त्यामुळे आवड असूनही वाचन करण्यासाठी पुरेशी पुस्तकं उपलब्ध नसतात. प्रियंकालाही लहानपणी वाचनाची आवड होती. मात्र गावातील शाळेत किंवा गावात अशाप्रकारची पुस्तकं उपलब्ध नव्हती. त्यानंतर पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर तिला नव्या जगाची ओळख झाली. योग्य वयात योग्य गोष्टी मिळाल्या नाही तर त्याचा आयुष्यात काहीही उपयोग होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. तसंच योग्य वयात योग्य पुस्तकं वाचली नाही तर माणूस जगापासून काही प्रमाणात मागे राहू शकतो. त्याच्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. हे सगळं तिने हेरलं आणि यातूनच ओपन बुक लायब्ररी समोर आली.
पाश्चात्य देशातील संस्कृती आपण स्वीकारतो. त्यात नव्या गोष्टी बघतो. त्याचप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीत वाचन संस्कृतीदेखील प्रगल्भ आहे. त्यामुळे फॅशन आणि बाकी गोष्टींसाठी ज्याप्रमाणे आपण पाश्चात्य देशातील संस्कृती आपण स्वीकारतो तसंच वाचन संस्कृतीसाठी करावा, असं प्रियंका सांगते. अनेक देशात अशाप्रकारच्या लायब्ररी आहेत. अशा लायब्ररी आपण पुण्यात किंवा महाराष्ट्रात सुरु केली तर तरुणाई वाचतील का? असा प्रश्न पडला मात्र ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी ही चळवळ नक्की पर्वणी ठरेल, असं ती म्हणते.
काय आहे ओपन बुक लायब्ररी?
वाचणाऱ्या प्रत्येकापर्यंत पुस्तक पोहोचवणं हा ओपन बुक लायब्ररीचा मुख्य हेतू आहे. मोठे ग्रंथालय उभारणं आता शक्य होत नाही. किंंवा त्यासाठी मोठं भांडवल लागतं. मात्र लहान स्वरुपात लोकसहभागातून लोकांनीच आपल्या परिसरात सुरु केलेलं हे ग्रंथालय आहे. अनेकांच्या घरात अनेक प्रकारची पुस्तकं असतात. आर्थिकदृष्ट्या अनेक विद्यार्थी किंवा वाचक पुस्तक विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाचून झालेली पुस्तकं या लायब्ररीत आणून ठेवल्याने त्या पुस्तकामार्फत अनेकांचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे अनेक गावात आणि पुण्यात अनेक ठिकाणी अशा लहान स्वरुपाच्या लायब्ररी सुरु करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 72 लहान मोठ्या गावात अशाप्रकारच्या उभारण्यात आल्या आहेत.
पुस्तक चोरीला गेलं तर...
या लायब्ररीला कोणीही वाली नसणार आहे. वाचकच या लायब्ररीचा वाली आहे. हवं ते पुस्तक जबाबदारीने घेऊन जायचं आणि वाचून परत आणून ठेवायचं अशी ही भन्नाट कल्पना आहे. याच चळवळीसाठी अभिषेक अवचरदेखील काम करतो. त्याला अनेकजण पुस्तक चोरी गेलं तर?, असा प्रश्न विचारतात. त्यावेळी तो म्हणतो की ज्या दिवशी भारतात वाचनासाठी पुस्तकं चोरी जातील त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रगल्भ होईल.