पुणे : बांधकाम क्षेत्रातील आर्थिक मंदीमुळे अडचणीत आलेल्या डीएसकेंची गुंतवणूकदरांनी भेट घेतली. गुंतवणूकदारांनी भेट घेऊन सद्यस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी गुंतवणूकदारांची भेट घेऊन त्यांनी परताव्याचं आश्वासन दिलं.

डीएसकेंकडे 2014 पासून अनेकांनी घरं बूक केलं आहे. मात्र अद्यापही त्यांना ताबा मिळालेला नाही. 2014 पर्यंत डीएसकेंचा गाडा सुरळीत होता. पण जेव्हा त्यांनी ड्रीम सिटी प्रोजेक्ट हाती घेतला. तेव्हापासून गाडी रुळावरुन घसरली.



स्वप्नवत वाटणाऱ्या या ड्रीम सिटीत काय नव्हतं, कृत्रिम नद्या, त्यातून सर्व शहराला जोडणारी जलवाहतूक. कल्पनेच्या पलिकडचं विश्व साकारण्याची डीएसकेंची इच्छा होती. या प्रोजेक्टसाठी त्यांनी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकर जागा निवडली. 19 डिसेंबर 2014 ला या योजनेचा थाटात शुभारंभ केला.

सर्व सुखसोयींनी संपन्न असणाऱ्या वनबीएचके फ्लॅटची किंमत तब्बल 70 लाखांपेक्षा जास्त होती. स्वप्नवत वाटणाऱ्या हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सारी आर्थिक ताकद पणाला लावली.

इतर व्यवसायातून येणारी सर्व आर्थिक रसद त्यांनी ड्रीम सिटीकडे वळवली. शेअर बाजारातूनही पैसा उभा केला. मात्र या प्रोजेक्टसाठी जमीन खरेदी करताना डीएसकेंनी पत्नी आणि नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांचा फायदा पोहोचवल्याचा आरोप होत आहे.

घराला घरपण देणाऱ्या डीएसकेंचं असं का झालं?


  • ड्रीम सिटी प्रोजेक्टसाठी डीएसकेंनी फक्त कागदी घोडे नाचवले.

  • एका कंपनीची स्थापना केली.

  • डीएसकेंच्या पत्नी हेमंती कुलकर्णी आणि त्यांचे नातेवाईक या कंपनीत भागीदार होते.

  • कंपनीनं शेतकऱ्यांकडून 55 लाख रुपये प्रतिएकर दरानं जमीन खरेदी केली.

  • 6 महिन्यात डीएसके डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीला ही जमीन 1 कोटी 30 लाख रुपये प्रति एकर या दराने विकली

  • यात हेमंती कुलकर्णी आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रति एकरी 75 लाख रुपयांचा नफा झाला.

  • संपूर्ण व्यवहारात 165 कोटी रुपयांचा फायदा झाला