Pune Rain: राज्यभरात परतीच्या पावसाने थैमान (Maharashta Rains Update) घातलं आहे. त्यात पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात पावसात जाण्याची शक्यता आहे. पुण्यात 19 ऑक्टोबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असे हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीचं नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
या वर्षी 21 ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात पाच दिवसीय दिवाळी साजरी होणार आहे. त्यासाठी पुणेकरांच्या घरात खरेदीची आणि दिवाळीच्या तयारीची लगबग सुरु आहे. दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार असल्याने सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मात्र याच काही दिवसात पुण्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. रविवारपर्यंत (16 ऑक्टोबर) महाराष्ट्रात फारसं ढगांचं आवरण नव्हतं. मात्र 17 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर नाही तर दक्षिण भागावर ढग दाटले आहेत. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात आर्द्रतेची पातळी हळूहळू वाढू लागली आहे. बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आणि 17 ऑक्टोबरपासून पश्चिम-वायव्य दिशेच्या हालचालींसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण-मध्य भागात वरच्या हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पुण्यासह राज्याच्या दक्षिण भागात काही दिवस पावसाची शक्यता वाढेल, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
दोन तासांच्या पावसाने पुणं पाण्यात
दोन दिवासांपूर्वी पुण्यात दोन तास मुसळधार पाऊस पडला होता. या पावसाने पुण्यातील मध्यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेक गाड्यादेखील वाहून गेल्या होत्या. दोन तास झालेल्या पावसाने पुण्यातील रस्त्यांना नाल्याचं स्वरुप आलं होतं. वनाज, जंगली महाराज रोडवर प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुण्यात पुढील काही दिवस मोठ्या प्रमाणात वादळी पावसाची शक्यता आहे.
राज्यभरात परतीच्या पावसानं थैमान
राज्यभरातील अनेक शहरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नागपूर, ठाणे या शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी पावसात साजरी करावी लागण्याची शक्यता आहे. या परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसत आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान या पावसानं झालं आहे. काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये सोयाबीन, कापूस तसेच भाजीपाला पिकाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतातील भात पीक झोपल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे.