Gajanan Marne :  पुण्यातील अट्टल गुंड गजानन मारणेच्या (gajanan marne) मुसक्या पुणे गुन्हे शाखेच्या (Pune police) खंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. साताऱ्यातील वाई जवळच्या ॲड.विजयसिंह ठोंबरे पाटील यांना फार्महाऊस वर भेटण्यासाठी आले असताना पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 


गजानन मारणे याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,  सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर  यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.


गज्या मारणेच्या टोळीने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली


दोन दिवसांपूर्वी याच टोळीतील कोल्हापूरमधील सराईत गुन्हेगार प्रकाश बांदिवडेकरला पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशातून ताब्यात घेतलं होतं. इंदूरमध्ये त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या खूनाच्या बदल्यात खून प्रकरणातील प्रकाश बांदिवडेकर सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खून, खंडणी असे अनेक गुन्हे दाखल आहेत.  सांगली आणि पुण्यात शेअरचा व्यवसाय करणाऱ्याचं वसुलीसाठी अपहरण केलं होतं. गुंड गज्या मारणेच्या टोळीने 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यांना जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती.


खंडणी प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई
खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप , हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील, अमर शिवाजी किर्दत, फिरोज महंमद शेख, गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे, रुपेश कृष्णाराव मारणे, संतोष शेलार , मोनिका अशोक पवार, अजय गोळे, नितीन पगारे, प्रसाद खंडागळे यांच्यावर अपहरण, मारहाण, खंडणी, जिवे मारण्याची धमकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती.