पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) आळंदीतील इंद्रायणी नदीला (Indrayani River) मोकळा श्वास देण्याचा विडा हाती घेतलाय. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालखी प्रस्थानाच्या दिवशी स्वतः इंद्रायणीची पाहणी केली. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याला ही गांभीर्याने घेतलेलं दिसत नाही. कारण हा जीवघेणा फेस प्रदूषण मंडळाच्या नजरेस पडतच नसल्याचे चित्र आहे.
सोमवारी प्रदूषण मंडळाने सर्व्हेक्षण केलं अन् इंद्रायणी नदी स्वच्छ वाहत असल्याचं थेट सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांना कळवले. पण हे कळवताना फोटो मात्र इंद्रायणी घाटालगतच्या नदीचे दिले आहेत. प्रत्यक्षात आळंदी बंधाऱ्याजवळ नदी आजही फेसाळलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्याने तोंडाला फेस आलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अशी खोटी माहिती देत थेट मुख्यमंत्र्यांची फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पाहणीनंतरही इंद्रायणी फेसाळलेलीच
आजवर प्रदूषण मंडळाच्या निष्क्रियतेमुळं इंद्रायणी नदी अशी विषारी बनली आहे. मात्र याचं सोयरसुतक या प्रदूषण मंडळाला नाही. सरकारची हीच उदासीनता गेली सात वर्षे वारकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणी फेसाळलेली आहे. हे पाहता इंद्रायणी कायमस्वरूपी मोकळा श्वास नेमका कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
प्रदूषण मंडळाचा दावा फोल
काही दिवसांपूर्वी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आळंदीतील गांधीवाडा आजोळघरी पहिला मुक्काम झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तसेच वारकऱ्यांशी संवाद साधत फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला. इंद्रायणी नदीची पाहणी केली. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्रायणी स्वच्छ करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र अजूनही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच असल्याचे प्रदूषण मंडळाचा दावा फोल ठरला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
वाळवंटी,चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला! आषाढीसाठी प्रशासन सज्ज , वारकऱ्यांसाठी 65 एकर जागा आरक्षित