Udayanraje Bhosale : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल चार जून रोजी लागणार आहे. मात्र, त्यापूर्वी राज्यभरात अनेक ठिकाणी हौशी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या विजयाचे बॅनर लावून विजयाचा दावा केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये, तर थेट साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. खंडोबा माळ परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. यापूर्वी शहरात अमोल कोल्हे, संजोग वाघेरे, श्रीरंग बारणे यांच्या विजयाचे सुद्धा बॅनर झळकले आहेत.
उदयनराजे भोसले यांच्याकडूनही विजयाचा दावा
दरम्यान, सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये थेट सामना झाला आहे. सातारा लोकसभेसाठी 60 टक्के मतदान झाले होते. दोन्ही बाजूने विजयाचा दावा करण्यात येत असला तरी निकाल हा चार जून रोजीच स्पष्ट होणार आहे. उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपल्या विजयाचा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उदयनराजे भोसले यांच्या विजयाचा दावा केला आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांनी सुद्धा विजयाचा दवा केला आहे. त्यामुळे कोणी कोणाला झटका दिला याचे उत्तर निकालात मिळणारआहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला होता, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांसह नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा सभा लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात असलेल्या जागांवर महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी मारणार याचे उत्तर सुद्धा 8 जून रोजीच मिळणार आहे.
सातारा लोकसभेचा काय आहे इतिहास?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उदयनराजे यांनी 1,26,528 मतांच्या फरकाने ही जागा जिंकली होती. त्यांना 52 टक्के मतांसह 579,026 मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता. त्यांना 452,498 मते (40.48%) मिळाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही उदयनराजे या जागेवर विजयी झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना 53.50 टक्के मतांसह 5,22,531 मते मिळाली. 2019 मध्येच झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या निवडणुकीत श्रीनिवास यांना 6,36,620 तर उदयनराजे यांना 5,48,903 मते मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या