पुणे : भारतात क्रिकेट वर्ल्डकपचे सामने सुरु आहेत. यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटप्रेमी भारतात दाखल झाले आहत. अशावेळी ब्लॅकने तिकीट विक्री होत असल्याचं आणि सट्टाबाजार ही तेजीत सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अख्ख्या जगाचं लक्ष या वर्ल्डकपकडे लागलेलं असताना, देशात सुरू असलेला हा काळाबजार रोखण्याचं आव्हान यंत्रणांसमोर आहे.
क्रिकेट वर्ल्डकप भारतात सुरु असल्याने क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठ्ठी पर्वणी आहे. म्हणूनच वर्ल्डकपचे हेच सामने पाहण्यासाठी फॅन्स देश-विदेशातून प्रत्येक स्टेडियमच्या ठिकाणी पोहचत आहेत. क्रिकेटसाठी वाट्टेल ते करणाऱ्यांमध्ये गुजरातच्या या फॅन्सचा ही समावेश आहे. भारताला चिअर करण्यासाठी हे क्रिकेट वेडे बाय रोड ते ही चारचाकीतून देशभर प्रवास करताना दिसत आहे. इतका खटाटोप केल्यानंतर मात्र तिकिटांसाठी त्यांची लुबाडणूक होत आहे. तिकीट विक्रीच्या काळाबाजाराने त्यांचा देशातील प्रत्येक स्टेडियमवर हिरमोड होत असल्याचा दावा क्रिकेटप्रेमी करत आहेत.
भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच वेळी दहा हजारांच्या पाच तिकिटांसाठी एक लाख दहा हजार रुपये मोजल्याचा, दावा क्रिकेटप्रेमीने केला. तेव्हाच दुसरीकडे पिंपरी चिंचवड पोलिसांनी ब्लॅकने तिकीट विक्री करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आळवल्या. यामुळं क्रिकेट वर्ल्डकप सामान्यांवेळी तिकीट विक्रीचा काळाबाजार सुरू असण्यावर एकाअर्थाने शिक्कामोर्तब झाला.
किती रुपयांना केली तिकिटांची विक्री?
- बाराशे रुपयांचे तिकीट बारा हजारांना
- पंधराशे रुपयांचे तिकीट पंधरा हजारांना
-दोन हजारांचे तिकीट बावीस हजारांना
-दोन हजार पाचशेचे तिकीट पंचवीस हजारांना
-चार हजारांचे तिकीट चाळीस हजार रुपयांना
ब्लॅकने तिकीट विक्रीसोबतच सट्टा बाजार सुरु
ब्लॅकने तिकीट विक्रीसोबतच सट्टा बाजार ही तेजीत सुरू असल्याचा पर्दाफाश झाला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिनेश शर्मा नामक बुकीच्या घरी छापा टाकून हे उघडकीस आणलं. 40 लाखांची रोकडही हाती लागली. इतके सबळ पुरावे असताना ही शर्माला अवघ्या चोवीस तासांत जामीन ही मिळाला. देशभरात सट्टा बाजार अनेकदा उघडकीस आलाय, पण त्यातील बहुतांश बुकींची सुटका काही तासांतच होते. कारण कायद्यात हा गुन्हा जामीनपात्र आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तिकीट विक्रीचा काळाबाजार होऊ नये म्हणून तिकिटांच्या ऑनलाईन विक्रीला प्राधान्य दिलं. पण ब्लॅकने तिकीट विक्री रोखण्यात यंत्रणांना अपयश आलंच. दुसरीकडे सट्टा बाजाराचा पर्दाफाश झाला अन बुकीची तातडीनं सुटकाही झाली. कायद्यात पळवाट असल्यानं अशा भामट्यांचं साधतंय खरं, पण यानिमित्ताने अख्ख्या जगाचं लक्ष लागून असलेल्या या वर्ल्डकप सामन्यांमध्ये हा काळाबाजार आपण रोखू शकलो नाही. तर भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखी बदलू शकतो.
इतर महत्वाची बातमी -