पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई, मनोरमा अद्याप पुणे पोलिसांसमोर हजर झाले नसून त्यांच्या बंगल्याला भलं मोठं कुलूप लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कुणी लावलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 


सोमवारी सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक या बंगल्यावर दाखल झाले होते, मात्र त्यांना घरातून कोणीही प्रतिसाद दिला नव्हता. मात्र आता या बंगल्याला एक  मोठं कुलूप लावण्यात आले आहे. हे कुलूप नेमके कोणी लावले? पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कधी लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे.


याबाबत माहिती देताना पोलिस म्हणाले, आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. त्यांचे मोबाईल देखील बंद आहेत. ते सापडल्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. जो गुन्हा झाला आहे त्याबाबत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून माहिती घेऊ. एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काहीचे मोबाईल नंबर आमच्याकडे नाहीत. त्या सर्वांचा शोध सुरू आहे. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत.


पूजा खेडकरांच्या आईवर गुन्हा दाखल


पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं. खेडकर कुटुंबानं कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


मनोरमा खेडकर यांनी बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकर यांची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत आले. आता त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलं आहे. त्यामुळे आता पोलीस पुढील काय कारवाई करणार हे पाहवं लागेल. 


पूजा खेडकरांची कागदपत्रं सापडली


वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचं प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. या प्रमाणपत्रांबाबतची कागदपत्रं सापडली आहेत. अहमदनगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे आणि जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षकांमध्ये बैठक पार पडली. पूजा खेडकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड झाली नसल्याचं  डॉ. घोगरे यांनी सांगितलं.


ही बातमी वाचा :