पुणे: राज्यात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरने (IAS Pooja Khedkar) एम.बी.बी.एसचे शिक्षण पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. पूजा खेडकर प्रकरणात अनेक नवनवे खुलासे समोर येत आहेत. अशातच या संपुर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते आणि आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी संताप व्यक्त केला आहे. 


रवींद्र धंगेकर यांनी खेडकर कुटुंबियांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, त्यांची सखोल चौकशी करा, अशी मागणी केली आहे. राजकीय नेत्यांच्या मागे इडी लावण्यापेक्षा आता या अधिकाऱ्यांवर ईडी लावा. संपूर्ण खेडकर कुटुंब भष्ट्राचारी आहे. राजकीय वरदहस्त असल्याशिवाय एवढा घोळ घालणं अशक्य आहे असं देखील रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी म्हटलं आहे. पूजा खेडकरने परीक्षेवेळी चुकीची कागदपत्रे जमा केली. बोगस कागदपत्रे देऊन तिने प्रवेश घेतला. या संपुर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा. तिने मोठ्या भ्रष्टाचाराने हे पद मिळवले आहे, त्याचा तपास व्हावा असंही धंगेकरांनी म्हटलं आहे. 


महाविद्यालयात प्रवेश घेताना पूजा खेडकर फीट असल्याचं सर्टिफिकेट


वादग्रस्त आयएएस अधिकारी पुजा खेडकरनं (IAS Pooja Khedkar)  पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एसचे शिक्षण पुर्ण केलं होतं. तिथे प्रवेश घेताना तिने ती पुर्णतः फीट असल्याचं तिला कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट सादर केलं होतं. त्याचबरोबर त्यावेळी तिचे वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील तिने ओबीसी कोट्यातून प्रवेश घेताना नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण घेताना तिचं नाव पूजा दिलीपराव खेडकर म्हणून नोंद करण्यात आलं होतं. या सगळ्याबाबत या वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ अरविंद भोरे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आता समोर आलेल्या या माहितीच्या आधारे पूजावरती कोणती कारवाई होणार का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. 


पुजा खेडकर दोषी असल्यास कारवाई करावी, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची मागणी 
पुजा खेडकर (IAS Pooja Khedkar) दोषी असल्यास कारवाई करावी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर पुजा खेडकरची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील राष्ट्रीय दृष्टीहीन संघाने केली आहे.