पुणे : प्रशिक्षणार्थ कार्यकाळ सुरू असताना चमकोगिरी करणाऱ्या वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांच्या (Pooja Khedkar) आईने पुणे पोलिसांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांनी त्यांच्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावल्याने त्या गाडीवर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना ही दमदाटी करण्यात आली. सगळ्यांनाच आतमध्ये टाकेन असं बोलत पूजा खेडकरांच्या आईने पोलिसांना दमदाटी केली, तसेच  पोलिसांना गेटबाहेरच उभं केल्याचं दिसून आलं. तसेच बंगल्याला आतमधून कुलूप लावण्यात आलं आहे. 


ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी दमदाटी केली. त्यांनी गेटला आतमधून कुलूप लावलं. तसेच कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आणि त्यांना गेटबाहेरच उभं केलं. 


खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला


ट्रेनी आयएएस असताना स्वतःच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा लावून चमकोगिरी केल्याप्रकरणी पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. अशा प्रकारचा दिवा कोणत्याही अधिकाऱ्याच्या गाडीवर लावण्यात येऊ नये अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या असतानाही पूजा खेडकरांनी ती गोष्ट केली. तसेच होम डिस्ट्रिक्टमध्ये ट्रेनी कार्यकाळ सुरू असताना त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांचे केबीन बळकावल्याची घटना घडली. अधिकारात नसताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून एक गाडी आणि शिपायी तसेच कार्यालयाची मागणी केली. 


खोट्या अपंग कागदपत्रांच्या आधारे कलेक्टर


ट्रेनी आयएएस असताना अवाजवी मागण्या करून वरिष्ठांना दमदाटी करणाऱ्या पूजा खेडकर यांचं पितळ आता उघड पडलं आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अंपग दाखल्याच्या आधारे आयएएस पद मिळवल्याचं समोर आलं आहे. पूजा खेडकरांनी ट्रेनी कार्यकाळात जे वर्तन केलं त्याबाबतचा अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठवला आहे. त्याचसोबत मसुरी येथील प्रशिक्षण संस्थेने पूजा खेडकरांच्या वर्तनासंबंधी अहवाल महाराष्ट्र शासनाकडून मागवला आहे. 


पूजा खेडकरांवर गुन्हा दाखल करा


डॉ. पूजा खेडकर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असून त्यांनी ओबीसी आरक्षणाचा फायदा कसा घेतला? त्यातील असणाऱ्या अटी आणि नियमायांचे पालन झाले नाही का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. प्रोबेशनरी पदावर असताना त्यांना होम टाऊन कसे मिळाले? पोलिसांनी त्यांच्या गाडीवर कारवाई केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे. 


ही बातमी वाचा: