पुणे : वादग्रस्त ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली असतानाच त्यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांचा अरेरावी करतानाचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मनोरमा खेडकर यांनी मुळशी (Mulshi) तालुक्यातील शेतकऱ्यांवर दादागिरी केल्याचे उघड झाले आहे. आता या प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूजा खेडकर यांच्या खासगी ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली होती. त्यातच आता मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मनोरमा खेडकर या हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसून येत आहे.
मनोरमा खेडकरांच्या अडचणीत वाढ?
आता याच व्हिडिओवरून त्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनोरमा खेडकर यांच्या दमदाटीच्या व्हिडिओची आता तपासणी होणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस या व्हिडिओची तपासणी करणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पिस्तूलचा अधिकृत परवाना मनोरमा खेडकर यांच्याकडे आहे का? हे देखील तपासले जाणार आहे. तो व्हिडीओ नेमका कधीचा आहे? याबाबतही तपासणी होणार असून पौड पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर हे सरकारी नोकरीत असताना त्यांनी कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली असून पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन त्यांच्या नावे आहे. मात्र ही जमीन खरेदी करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरदेखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांनी या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. याबाबत शेतकऱ्यांनी पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र याबाबत तक्रारदेखील नोंदवण्यात आलेली नाही. मात्र आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या