IAS Probationer Pooja Khedkar : पुणे :  जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा जास्त रुबाब करणाऱ्या या ट्रेनी आयएएस (Trainee IAS Officer) डॉ. पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची चर्चा रंगली आहे. पूजा खेडकर यांच्यासोबतच आता अख्खं खेडकर कुटुंबीय चर्चेत आलं आहे. अरेरावी, दमदाटी म्हणजे, खेडकर कुटुंबीयांची ओळखंच आहे की, काय? असा प्रश्नच आता उपस्थित होत आहे. ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकरांनी अरेरावी केल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता याच मनोरमा खेडकरांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


अधिकारी होण्यापूर्वीच थाटात रुबाब करणाऱ्या प्रोबेशनर आयएएस डॉ. पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी व्हिडीओत रेकॉर्ड झाली आहे. शेजारील जमिनीवर अतिक्रमण करण्याचा मनोरमा खेडकरांचा प्रयत्न असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


वादग्रस्त IAS अधिकारी पुजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी सरकारी नोकरी करताना कोट्यावधी रुपयांची संपत्ती कमावली आहे. त्यातून त्यांनी अनेक ठिकाणी जमीन खरेदी केली आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली आहे. ती करताना शेजारच्या शेतकऱ्यांच्या जमीनीवर देखील त्यांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्यांनी जेव्हा या गोष्टीला विरोध केला, तेव्हा पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाऊन्सर घेऊन तिथं पोहचल्या आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं. आश्चर्याची बाब म्हणजे, या शेतकऱ्यांनी याबाबत पुण्यातील पौड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरून दबाव आल्यानं त्यांची साधी तक्रारही नोंदवली गेली नाही. त्यामुळे या खेडकर कुटुंबाला नक्की कोणाचा पाठिंबा आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


खेडकर कुटुंबीयांचं 'बारामती कनेक्शन' उघड 


वादग्रस्त सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांनी बारामती तालुक्यात जमीन खरेदी केली असल्याचं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समोर आणली आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथे दिलीप खेडकर यांची 14 गुंठे जमीन असल्याचं ट्वीट विजय कुंभार यांनी केलं आहे. वाघळवाडी ग्रामपंचायत हद्दीत गट क्रमांक 8 मध्ये दिलीप खेडकर यांच्या नावावर 14 गुंठे जमीन आहे. ही जमीन त्यांनी 2010 ते 2011 च्या दरम्यान खरेदी केली असल्याचं बोललं जातं आहे. दिलीप खेडकर यांची बारामतीतील वाघळवाडी येथे जमीन असल्यानं खेडकर यांचं बारामती कनेक्शन समोर आलं आहे.


पाहा व्हिडीओ : Pooja Khedkar IAS : पूजा खेडकर यांच्या आईकडून बाऊन्सर घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी? जुना व्हिडीओ समोर



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


पूजा खेडकर यांचे 'बारामती कनेक्शन'; मुळशीतही अरेरावी, दमदाटी करत जमीन बळकावल्याचा आरोप; खेडकरांचे पाय दिवसेंदिवस खोलात