पुणे : 'एबीपी माझा'ने IAS पूजा खेडकर आणि पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाची पोलखोल केली होती. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळेंनी चौकशीचा सुधारित अहवाल सादर केला. यात तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना क्लीनचिट देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र हा अहवाल पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह यांना मान्य होणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. 


पूजा खेडकरांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र (Disability Certificate) बनावट आहे का अशी शंका उपस्थित करणारे, किंबहुना त्यावर शिक्कामोर्तब करणारे पुरावे एबीपी माझाने समोर आणले होते. तरीही डॉ. वाबळेंनी पूजा खेडकरांना हे प्रमाणपत्र कोणत्या आधारे दिलं हे या अहवालात नमूद केलं आहे का? असेल तर त्याचे कोणते पुरावे आयुक्तांकडे सादर केलेत? ते पुरावे आयुक्तांना मान्य असणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 


बुधवारी हा सुधारित चौकशीचा अहवाल पाहून तो जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपवायचा की नाही? याचा अंतिम निर्णय पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त घेणार आहेत.


पूजा खेडकरला अंतिम नोटीस


पूजा खेडकरच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरला कार्मिक विभागाने नोटीस बजावली असून 2 ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जर 2 ऑगस्टपर्यंत उत्तर मिळाले नाही तर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.


पूजा खेडकरच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरून वाद निर्माण झाल्यानंतर तिला मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात 23 जुलै पूर्वी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्या ठिकाणी पूजा खेडकर पोहोचलीच नाही. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपानंतर पुणे पोलिसांसमोर देखील चौकशीसाठी तीन नोटीसा देऊन देखील ती अनुपस्थित राहिली होती.  


कार्मिक विभागाने स्थापन केलेल्या समितीने खेडकरवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारा अहवाल सादर केल्याची माहिती आहे. पुढील कारवाईपूर्वी पूजा खेडकरची बाजू ऐकली जावी म्हणून नोटीस जारी करण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: