Bhimashankar Shiv Temple : श्रावण महिना संपायला काही दिवस उरले आहेत. आज (22 ऑगस्ट ) श्रावणातला शेवटचा सोमवार आहे. श्रावणातील शिवशंभूच्या ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण केल्यानेच महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 12 ज्योतिर्लिंगाचा महिमा अतुलनीय आहे. शंकराची भक्ती करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे यापैकी एक म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग (Bhimashankar temple, Pune). भोलेनाथाच्या या धामाला भीमाशंकर हे नाव कसे पडले त्याचा इतिहास काय? जाणून घेऊया.


भीमाशंकर मंदिराचा परिसर


महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे. या शिवधाममध्ये स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात शिव आणि दैत्य त्रिपुरासुर यांच्यातील युद्धात इतकी उष्णता निर्माण झाली की भीमा नदी कोरडी पडली नंतर शंकरजींच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असं म्हटलं जातं.



भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचा महिमा शिवपुराणात वर्णिला आहे. पौराणिक कथेनुसार रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा मुलगा भीम त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मला. प्रभू रामाने आपल्या वडिलांची हत्या केली आहे हे जेव्हा त्याला समजलं  तेव्हा त्याला सूडाची भावना वाटली. रामाशी युद्ध सोपं नव्हतं म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्माजींना प्रसन्न केले. ब्रह्माजींनी त्याला विजयी होण्याचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.



त्यामुळे भीमाशंकर हे नाव पडले


वरदान मिळाल्यानंतर भीम राक्षस अत्यंत शक्तिशाली झाला आणि त्याने आपल्या आसुरी शक्तीचा वापर करून लोकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली. भीमाच्या अत्याचारामुळे सर्वत्र हाहाकार माजला होता. त्याच्या दहशतीने सामान्य लोकच नव्हे तर देवताही त्रस्त झाल्या होत्या. शेवटी सर्वांनी भोलेनाथकडे मदत मागितली. भगवान शिवाने येथे युद्ध करून भीमाचा वध केला. यानंतर सर्व देवांनी महादेवांना शिवलिंगाच्या रूपात या ठिकाणी निवास करण्यास सांगितले. शिवाने देवतांचे पालन केले, तेव्हापासून हे स्थान भीमाशंकर म्हणून ओळखले जाते.



सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेला शंकर


संह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये भीमाशंकरच्या जंगलात हे मंदिर आहे. आजुबाजूला संपुर्ण निसर्गरम्य वातावरणात मंदिराचा परिसर असल्याने भाविकच नाही तर पर्यटक आणि ट्रेकर्ससुद्धा आवर्जुन या मंदिराला भेट देतात. जंगलात विविध प्रकारचे प्राणी आणि काही दुर्मिळ जातीचे पक्षीदेखील बघायला मिळतात. त्यासोबतच खंड्या पक्षी हे या जंगलाचं विशेष आकर्षण आहे. त्यामुळे अनेक पक्षी अभ्यासकदेखील या ठिकणी आवर्जुन अभ्यासासाठी येतात. हे महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात आहे. सह्याद्री पर्वताच्या घाट भागात ते शिवाजीनगरपासून 127 कि.मी. अंतरावर आहे.