पुणे: आयटी हबमुळे हिंजवडी ही जगाच्या नकाशावर पोहचली. मात्र, आज याच हिंजवडीची तहान भागवणारी मुळा नदी आयटी हबमुळं प्रदूषित होत असल्याचा ठपका महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे. कंपन्यांच्या पाण्यावर प्रक्रिया न करताच हे पाणी थेट मुळा नदीत सोडण्यात येत असल्याचे निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने हिंजवडी आयटी पार्क अर्थात एमआयडीसीला नोटीस बजावली आहे. 


नेमकं प्रकरण काय?


काही दिवसांपूर्वी याचं प्रदूषित पाण्यामुळं मुळा नदीतील मासे मृत पावले होते. या तक्रारी समोर येताच प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली, त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं. तिथले पाण्याचे नमुने घेतले, तसेच एमआयडीसीने उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली. तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. या प्रकल्पात अनेक गंभीर त्रुटी अन नियमांचे उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आलं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 4 मेगालिटर असताना प्रत्यक्षात तिथे प्रतिदिन 1.5 मेगालिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे आढळून आले. 


अपुऱ्या सुविधा असल्याने हा प्रकल्प कमी क्षमतेने सुरू आहे, असे ही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात काही यंत्रणा बंद अवस्थेत ही आहेत, साठवण टाक्या योग्य स्थितीत ही नसल्याने सांडपाण्याची दुर्गंधी पसरत आहेत. प्रकल्पाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा नाही. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात नाही. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून दररोज प्रक्रिया केलेल्या पाण्याचे केवळ 8 ते 10 टँकर बाहेर पाठविले जातात.


इतर सर्व अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी थेट मुळा नदीत सोडले जाते. प्रकल्पाच्या बाहेरील सांडपाणी वाहिन्या फुटलेल्या अवस्थेत आहेत, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. 8 नोव्हेंबरला पाठवलेल्या नोटिशीला दोन आठवड्यात उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काही कारवाई करते का हे पाहणं महत्वाचे आहे. कारण याआधी ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक एमआयडीसी, पिंपरी पालकांना वारंवार नोटिसा धाडलेल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ कारवाईचा फार्स केला जातो, हे प्रत्येकवेळी उघड झालं आहे. आता हिंजवडी आयटी पार्कबाबत तेच घडेल की काय? अशी शंका उपस्थित होताना दिसत आहे.


तीन महिन्यांमध्ये तीन वेळा नोटीस


गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एमआयडीसीला तीन वेळा नोटीस बजावण्यात आलेली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाबाबत या नोटिसा देण्यात आल्या आहेत. सप्टेंबरमध्ये कुरकुंभ एमआयडीसीला, ऑक्टोबरमध्ये रांजणगाव एमआयडीसीला आणि आता हिंजवडी आयटी पार्कला नोटीस बजावण्यात आली आहे.