पुणे : विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते व दिग्गज मंडळी सध्या प्रचारात व्यस्त आहेत. यासह युवा नेते आणि तरुण तडफदार आमदारही पक्षासाठी व आपल्या राजकीय अस्तित्वाच्या लढाईसाठी महाराष्ट्र दौरा करुन मतदारसंघ गाजवत आहेत. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांसह इतरही युवा नेते पक्षासाठी प्रचार करत आहेत. शिवसेना ठाकरेंचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज खेड विधानसभा मतदारसंघात सभा घेत आहेत. खेडमधील देवाच्या आळंदीत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी शिवसेना नाव आणि चिन्हा नेल्याप्रकरणी गद्दार म्हणत निशाणा साधला. तसेच, 'हे' उद्या ठाकरे आडनाव लावून देखील फिरतील, असा टोलाही एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) लगावला आहे. 


आम्हाला राजकारणातून संपवायचं आहे, असं यांना वाटलं. अगदी उद्या हे ठाकरे आडनाव लावून ही फिरतील. एकवेळ असा विचार करा, आम्ही राजकारणातून बाहेर झालो. पण, एकतरी उद्योग राज्यात आणून दाखवायचा ना?, असे म्हणत राज्यातील उद्योग गुजरातला नेत असल्यावरुन आदित्य ठाकरेंनी महायुती व मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं. बडोद्यातील रोड शो महाराष्ट्राला डीवचण्यासाठीच काढला. बडोद्यामध्ये नेमका रोड शो कशासाठी काढला, नरेंद्र मोदी सांगतील का? देतील का याचं उत्तर? तिथं कोणती ही निवडणूक नाही. महाराष्ट्राच्या नाकावर टिच्चून, तरुणांचे रोजगार पळवून एअर बस प्रकल्प तिकडे नेल्याचा आनंद मोदींनी साजरा केल्याचे सांगत आदित्य ठाकरेंनी बडोद्यातील रोड शोवरुन महायुती व भाजपला लक्ष्य केलं. 


शिंदे, फडणवीसांना लाडका भाऊ कसं काय मानणार?


सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महायुतीने पक्षात घेतलं. महिला पत्रकाराला तुझा बलात्कार झाला का? असा प्रश्न विचारणाऱ्यांना तुम्ही तुमचे लाडके भाऊ समजणार का? दीड हजार रुपयांसाठी तुम्ही त्यांना मत देणार का?, असा सवालही आदित्य यांनी विचारला. तसेच, भाजप मोठी जादूगार आहे, 2014 मधील 15 लाखांचे 2024 मध्ये 1500 झाले. 2014 मध्ये हीच भाजपा 15 लाख रुपये देणार होती. भाजप खूप मोठी जादूगार आहे, आता डोळे मिठा अन् उघडा असे म्हणत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दिल्यावरुन आदित्य ठाकरेंनी महायुतीला लक्ष्य केलं. 


शेती कशी करावी, मुख्यमंत्र्यांकडून शिका 


शेतकऱ्यांनो सांगा, तुम्ही किती वर्षांपासून शेती करताय. पण, तुम्ही कधी हेलिकॉप्टरमधून शेतात गेलात का? नाही, मग तुम्ही कसली शेती करताय तेंव्हा, मुख्यमंत्र्यांकडून शिका, ते बघा नेहमी हेलिकॉप्टरमधून थेट शेतात जातात, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल आदित्य यांनी केला. 


हेही वाचा


नोकऱ्या अन् पगारवाढ देणारं देशातील 1 नंबरचं शहर बंगळुरू; मुंबई कितव्या स्थानी, सरकारी वेतन किती?