मुंबई : पुणे पोलिसांनी खाजगी बस वाहतूकदारांना दिवसभरासाठी पुणे शहरात घातलेली बंदी अन्यायकारक असून ही बंदी उठवण्यात यावी यासाठी हायकोर्टात धाव घेतलेल्या लक्झरी बस चालकांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे. पोलिसांनी खाजगी बस वाहतूकीवर घातलेली बंदी उठवत हायकोर्टाने पुण्यात खाजगी बसचालकांना दिवसाही वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ही बंदी उठवण्यात आली असून याप्रकरणी पुणे वाहतूक पोलिसांना यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

वाहतूक कोंडीचे कारण देत पुणे पोलिसांनी खाजगी बस वाहतुकीवर पुणे शहरात बंदी घातली आहे. यासंदर्भात पोलिसांनी 26 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली असून या अधिसुचनेनुसार मुंबई, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर येथे जाणाऱ्या बसेसना सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत बंदी घालण्यात आली आहे.

या बंदीमुळे वाहतूकदारांसह प्रवाशांचे नुकसान होत असल्याने कोंडूस्कर ट्रॅव्हल्सनं पुणे पोलिसांच्या याअधिसूचनेला हायकोर्टात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देत शहरातील खाजगी बस वाहतुकीवर पोलिसांनी घातलेली बंदी तूर्तास उठवली व याप्रकरणावरील सुनावणी 26 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे.