लिव्ह-इन पार्टनरची नस कापून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2018 03:39 PM (IST)
आमीर मूळचा नालासोपाऱ्याचा असून तो पत्नी-मुलांना सोडून या तरुणीसोबत राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून आमीरने तिच्यामागे लग्नाचा ससेमिरा लावला.
NEXT PREV
पिंपरी चिंचवड : 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहूनही लग्नास नकार देणाऱ्या तरुणीच्या हाताची नस प्रियकराने कापल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. यानंतर स्वतःच्याही हाताची नस कापून प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने यात दोघेही बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. आमीर मूनशी असं हल्ला करणाऱ्या तरुणाचं नाव असून तो विवाहित आहे. आमीर मूळचा नालासोपाऱ्याचा असून तो पत्नी-मुलांना सोडून या तरुणीसोबत राहत होता. विशेष म्हणजे अमिरचे आई-वडील त्याच्या पत्नी-मुलांचा सांभाळ करतात. हे दोघे सुरुवातीला पुण्यातील कोंढवा इथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. नंतर ते पिंपळे सौदागरमध्ये वास्तव्यास आले. दरम्यान काही महिन्यांपासून अमीरने तिच्यामागे लग्नाचा ससेमिरा लावला. पण तिने नकार दिल्याने अमीर चांगलाच संतापला होता. त्यातूनच गेल्या तीन महिन्यापासून त्यांचं भेटणं ही कमी झालं होतं. मात्र काल त्याचा राग अनावर झाल्याने त्याने राहत्या तिच्या हाताची नस कापून, जीवे मारण्याचा तर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आधी दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार झाले. दोघांची प्रकृती स्थिर असून तरुणीला पुण्याच्या ससून रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवले आहे. सांगवी पोलीस याचा तपास करत आहेत.