पुणे :  पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.  पुणे मेट्रो कार्ड   (Pune Metro)  आणि पुणे मेट्रो स्टुडंट पासवरील हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या एक्स हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. 'वन पुणे कार्ड आणि वन पुणे विद्यार्थी पास हेल्पलाईन क्रमांक बदलण्यात आला आहे. कार्डधारक प्रवासी 23 फेब्रुवारी 2024 पासून 022 - 45000800 या नवीन क्रमांकावर संपर्क साधून मदत घेऊ शकतात',असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. 
 
त्यासोबतच  पुणे मेट्रोने एक निवेदन जारी करून प्रवाशांना 1 मार्चपासून परतीच्या प्रवासाची तिकिटे खरेदी करता येणार नसल्याची माहिती दिली आहे. पुणे मेट्रोच्या एक्स हँडलवरून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे की, "अटेंशन पॅसेंजर: रिटर्न जर्नी तिकीट (आरजेटी) खरेदी करण्याची सुविधा 1 मार्च 2024 पासून बंद केली जाईल. आम्ही सर्व प्रवाशांना विनंती करतो की त्यांनी या महत्वाच्या अपडेटची नोंद घ्यावी.






रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण


पुणे मेट्रोने रुबी हॉल ते रामवाडी मार्गाचे काम पूर्ण केले आहे. सध्या प्रवासी सेवा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) आयुक्तांनी  प्रवासी सेवा सुरू करण्यास सशर्त मान्यता दिली आहे, परंतु राज्य सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. साधू वासवानी रेल्वे ओव्हरब्रिज पाडण्यासाठी वाहतूक वळविण्यात आल्याने सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. 


मेट्रो प्रवाशांची संख्या घटली


पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरु करण्यात आली. मेट्रोमुळे वाहतूक कोंडी फुटेल,अशी पुणेकरांना आणि प्रशासनाला अपेक्षा होती मात्र झालं उलटंच. पुणे मेट्रो सुरु झाली पण त्यासोबतच वाहतूक कोंडी आणि शहरात दुचाकींची संख्याही वाढली. सुरुवातीला काही दिवस मेट्रोची हौस-मौज केली पण नंतर पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. पुण्यात पुणे मेट्रोकडून वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट असे 33 किलोमीटरचे दोन मेट्रो मार्ग उभारण्यात येत आहेत. त्यातील पंचवीस किलोमीटरचे काम पूर्ण झालं आहे आणि आठ किलोमीटरचे राहिलं आहे . मात्र या 25 किलोमीटरवर प्रवाशांची संख्या वाढण्याऐवजी घटली आहे. सुरुवातीला मेट्रो कशी आहे हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली. पुणे मेट्रोत ढोल ताशा , फॅशन शो , जादूचे प्रयोग , झिम्मा - फुगडी असे अनेक खेळ खेळले गेले. मात्र सुरुवातीची उत्सुकता संपल्यावर ही प्रवासी संख्या कमी होत गेली. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Crime News : पुण्यातील तरुणाई नशेत तुल्ल; पिट्या भाईंनी समोर आणला राज्याला हादरवणारा व्हिडीओ...