Pune Rain : पुण्यात सोमवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर गावात राहणारे अजित व्यंकट शिंदे ( वय 42) हे ओढ्यावरील पूल ओलांडताना वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. भोर शहराजवळील नीरा नदीत वाहून गेल्याने धनंजय अशोक शिरवळे (वय 24) या तरुणाचा मृत्यू झाला. इंदापूर येथील बोरकडवाडी येथे ओंकार हाके (वय 18) हा ओढ्यात वाहून गेला होता. मात्र स्थानिकांना त्याला वाचवण्यात यश आलं. 


सोमवारी रात्री पुण्यात आणि ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पुण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामीण भागात खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने 118 हून अधिक कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. मंगळवारी सकाळपर्यंत सुरू असलेल्या पावसात जिल्हाभरातील अनेक घरांचं देखील नुकसान झालं आहे. 


भारतीय हवामान खात्याने  पुणे जिल्ह्यासाठी 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पुणे शहर, दौंड आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. आंबेगाव, बारामती आणि शिरूर भागात पाऊस थोड्या कमी प्रमाणात झाला.


अग्निशमन दलाच्या जवानांमुळे मोठे अनर्थ टळले


पुणे शहर आणि परिसरात सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. रात्री 10 वाजल्यापासून अग्निशमन दलाला पाणी भरल्याचे, पुरस्थिती निर्माण झाल्याचे फोन येऊ लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या पथकांनी पूर, पाणी तुंबणे आणि घरांमध्ये पाणी शिरणे आदी विविध घटनांमध्ये 42 ठिकाणी मदत पुरवली. या घटना सुखसागरनगर, कोंढवा खुर्द, रास्ता पेठ, बीटी कवडे रोड, हडपसर, मंगळवार पेठ, शिवाजीनगर, कसबा पेठ, कुंभारवाडा, नारायण पेठ, औंध, पर्वती, मित्रमंडळ चौक, नगर रोड, महर्षी नगर, बिबवेवाडी, मार्केट यार्ड आणि भवानी पेठ परिसरात घडल्या. पिंपरी-चिंचवड आणि परिसरातूनही पूर आणि पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहे, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. 


मंगळवार पेठ परिसरात पुरामुळे घरात अडकलेल्या कुटुंबातील पाच जणांची अग्निशमन दलाने सुटका केली. कोंढवा खुर्द परिसरात पुरामुळे अडकलेल्या सात जणांना कोंढवा अग्निशमन केंद्राच्या पथकाने बाहेर काढले. पर्वती आणि धानोरी परिसरात कंपाऊंड भिंत कोसळण्याच्या दोन घटना घडल्या तर हडपसर, चंदननगर आणि पाषाण रोड, मंगलदास रोड, मार्केट यार्ड आणि विश्रांतवाडी परिसरात मोठी झाडे पडण्याच्या 12 घटना घडल्या. झाड कोसळण्याच्या घटनेत दुचाकीवरून जाणारा एक जण जखमी झाला, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.