पुणे: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात मान्सून सक्रिय झाल्याने पुणे घाटमाथ्याला हवामान विभागाने 24 ते 27 ऑगस्ट हे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरावर क्युम्युनोलिंबस (पांढऱ्या रंगाचे बाष्पयुक्त ढग) वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक जमा झाले आहेत. त्यामुळे ज्या भागात हे ढग जास्त आहेत त्या ठिकाणी मुसळधार (Heavy Rain) तर ज्या भागात ढग कमी आहेत तेथे कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. (Heavy rain again in Pune Riverside vigilance warning release from Khadakwasla dam has started)
खडकवासला धरणातून सुरू करणार विसर्ग
खडकवासला धरणातून आज दुपारी मुठा नदी पात्रात 8 हजार 734 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये त्याचबरोबर खबरदारी घ्यावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
पवना नदी काठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा
खडकवासला पाठोपाठ पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पवना धरण सद्यस्थितीत 99% भरलेले असून पाणलोट क्षेत्रात पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात येणारा येवा विचारात घेता लवकरच पाणीसाठा 10 % होण्याची दाट शक्यता आहे. सद्यस्थितीत धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक्स इतक्या क्षमतेने नदीपात्रात विसर्ग सुरू असून पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार सांडव्याद्वारे विसर्ग सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीमधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत जलसंपदा विभागास/प्रशासनास सहकार्य करावे, अशी माहिती पवना धरण पूरनियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
मंगळवारी यलो अलर्ट
शनिवार ते सोमवार (दि. 24 ते 26) हे तीन दिवस पुण्यासह घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट तर मंगळवारी (दि. 27) यलो अलर्ट दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, सतर्क रहावं, आवश्क असल्यास घराबाहेर पडावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे, त्याचबरोबर घराबाहेर जाताना छत्री, रेनकोट घेऊनच बाहेर जावे. झाडाखाली थांबू नये, असा सल्लाही हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.