पुणे : आरोग्य भरतीच्या पेपर फुटीला पाच महिने उलटून गेले आहेत. मात्र ना या परीक्षेचा निकाल लावण्यात आला ना ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे आठ लाख  विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. त्यामुळे राज्यभरातून एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी पुण्यातील आरोग्य संचलनालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. 


चोर सोडून संन्याशाला फाशी ही म्हण या तरुणांच्या बाबतीत खरी ठरली आहे. अनेक वर्ष ज्या परीक्षेची तयारी केली त्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर आरोग्य विभागातील अधिकारी, परीक्षा घेणाऱ्या कंपनीचे अधिकारी आणि दलाल यांनी एकत्र येऊन फोडल्याने या विद्यार्थ्यांची मेहनत वाया जात आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आरोग्य भरतीच्या गट क आणि गट ड परीक्षेचा पेपर फुटला. याला पाच महिने उलटल्यानंतर देखील या परीक्षा देणाऱ्या तब्बल आठ लाख विद्यार्थ्यांना आपलं काय होणार या प्रश्नाच उत्तर मिळालेलं नाही. आरोग्य सेवेची ही परीक्षाच रद्द करुन ती नव्याने राबवण्याची मागणी काही विद्यार्थी करत आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत ते विद्यार्थी संपूर्ण परीक्षा रद्द न करता ज्या विषयांचे पेपर फुटलेले नाहीत त्या विषयांचा निकाल लावण्याची मागणी करत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी आजपासून पुण्यातील आरोग्य संचलनासमोर बेमुदत उपोषण सुरु केलं आहे. 


आरोग्य भरतीचा पेपर फोडल्याबद्दल पुणे पोलिसांनी आतापर्यंत आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले, लातूरच्या आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी प्रशांत बडगिरे यांच्यासह अनेक दलालांना अटक केली आहे. त्याचबरोबर ही परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या न्यासा कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली. आरोग्य भरती घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पुणे सायबर पोलिसांना या न्यासा कंपनीचे अधिकारी म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडण्यातही सहभागी असल्याचं आढळलं. म्हाडाच्या परीक्षेचा तपास करताना टीईटी परीक्षेचा पेपरही गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने फोडला जात असल्याचं पोलिसांना आढळलं आणि पोलिसांनी राज्याच्या परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे, शिक्षण परिषदेचा निवृत्त सचिव सुखदेव डेरे आणि शालेय शिक्षण विभागाचा उपसचिव सुशील खोडवेकर यांच्यासह अनेक अधिकारी आणि दलालांना अटक केली. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा असे घोटाळे उघड होत गेल्याने पोलिसांच्या तपासाची व्यप्ती वाढत गेली. पण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत मात्र ना आरोग्य विभागाने कोणता निर्णय घेतला ना शालेय शिक्षण विभागाने. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून परीक्षेच्या या फेऱ्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसमोर उपोषण करण्याची वेळ आली आहे. 


आरोग्य भरतीचा यावर्षीचा पेपर, टीईटीचे मागील तीन वर्षांचे पेपर, पोलीस भरती, म्हाडा या सर्वच परीक्षांभोवती या पेपर फुटीमुळे संशयाचं धुकं दाटलं आहे. या परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यात असमर्थ ठरलेल्या सरकारने या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्याचे पुढे काय होणार याबाबतही काही सांगितलेले नाही. त्यामुळे प्रामाणिकपणाने अभ्यास करुन परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थ्यांचे भवित्तव्य टांगणीला लागलं आहे. 


आरोग्य भरतीचा पेपर फुटल्याचा बोभाटा झाल्यावर देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे पेपर फुटल्याचं मान्य करण्यास तयार नव्हते. माध्यमांनी ही पेपरफुटी चव्हाटयावर आणल्यावर पोलिसांनी कारवाई सुरु केली. आता पाच महिने उलटून गेल्यावर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णयही ते घेत नाहीत. पेपर फोडून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करण्यात पेपर फोडण्यात सहभागी अधिकारी आणि दलाल जसे कारणीभूत आहेत तेवढीच आरोग्यमंत्र्यांची या प्रकरणातील अनास्थाही कारणीभूत आहे.