Madhav Godbole : भारताचे माजी केंद्रीय गृहसचिव डॉ. माधव गोडबोले यांचे पुण्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खंबीर प्रशासकीय अधिकारी आणि लेखक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने प्रशासनावर हातखंडा असणारा, संवेदनशील अधिकारी, परखड भाष्य करणारा लेखक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.  


डॉ. माधव गोडबोले हे सन 1959 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते. केंद्र सरकारचे गृहसचिव असताना 1993 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. निवृत्ती घेतल्यानंतरही त्यांनी प्रशासकीय धोरणांच्या अनुषंगानेही जबाबदारी पार पाडली. माधव गोडबोल यांनी निवृत्तीनंतर जम्मू आणि काश्मीर सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्‍रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती आदी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. भारतीय राजकारणाला कलाटणी देणाऱ्या बाबरी मशिदी पाडण्याची घटना होत असताना ते केंद्रीय गृहसचिव होते. त्यांनी आणि त्यांच्या मंत्रालयाने दिलेल्या सूचनांकडे त्यावेळचे पंतप्रधान नरसिंहराव राव यांनी गांभीर्यपूर्वक पाहिलं नसल्याची चर्चा सुरू असते. 


डॉ. माधव गोडबोले यांनी प्रशासनासह साहित्यसंपदेतही  आपला ठसा उमटवला. माधव गोडबोले यांनी जवळपास 22 पुस्तके लिहिली. त्यातील अनेक पुस्तके ही इंग्रजी भाषेत आहेत. त्यातील काही पुस्तकांचे मराठीत अनुवाद झाला आहे.  An unfinished innings हे आत्मचरित्रात्मक पुस्तक 'अपुरा डाव' या नावाने प्रकाशित झाले आहे. तर, भारताच्या फाळणीवरील  The Holocaust of Indian Partition - An Inquest या पुस्तकाचीही चर्चा झाली.  माधव गोडबोले यांच्या मराठीतील पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत. 


डॉ. माधव गोडबोले यांची कारकीर्द 


माधव गोडबोले यांनी अमेरिकेतील विल्यम्स कॉलेजमधून विकासाचे अर्थशास्त्र या विषयात एम.ए. व पीएच्‌.डी. या पदव्या मिळवली. डॉ. माधव गोडबोले यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मुख्य आर्थिक सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्याशिवाय, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यांनी मनिला येथील आशियाई विकास बँकेत पाच वर्षे काम केले. 


डॉ. माधव गोडबोले यांची काही ग्रंथसंपदा


> The Babri Masjid-Ram Mandir Dilemma : An Acid Test for Indian Constitution (ऑगस्ट 20198


> The God who Failed - An Assessment of Jawaharlal Nehru's Leadership (2014)


> Good Governance : Never on India's Radar (2014)(मराठीत - सुशासन हे दिवास्वप्नच)


> The Holocaust of Indian Partition - An Inquest (2006) (फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा )


> Secularism : India at a Crossroad (2016) (हिंदीत - धर्मनिरपेक्षितता : दोराहे पर भारत, २०१८.


> अपुरा डाव ( Unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant (1996) 


> कलम ३७० (ऑक्टोबर २०१९)


> जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व - एक सिंहावलोकन (मे २०१४) 


> भारताची धर्मनिरपेक्षता-धोक्याच्या वळणावर


> लोकपालाची मोहिनी (जून २०११)


> सत्ता आणि शहाणपण (एप्रिल २००५) - लेखसंग्रह


> सार्वजनिक जबाबदारी व पादर्शकता; सुशासनाचे अत्यावश्यक घटक (२००३ ) 


पाहा: Madhav Godbode | अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमिवर माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांच्याशी बातचीत