पुणे: पुण्यामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) 22 संशयित रुग्ण सापडल्याची माहिती आहे. आय सी एम आर एन आय व्हीला तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) विरोधात महापालिका अलर्ट मोडमध्ये आली आहे. एनआयव्हीचा रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागात टीम दाखल करणार आहे. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाखांमध्ये एका व्यक्तीला आढळतो अशी माहिती आहे. याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे (Dr Nina Borade) यांनी एबीपी माझाशी बोलताना या आजाराबाबतची माहिती दिली आहे.
आजार धोकादायक आहे का नाही?
डॉ. नीना बोराडे म्हणाल्या, पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आहेत, सहा संशयित रुग्ण पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत आहेत. या सगळ्यांचे सॅम्पल्स एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहे. आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो आणि आजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. 12 ते 30 वयोगटाच्या दरम्यान व्यक्तींना हा आजार होतो. हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे काही कारण नाही. आज या आजारासंदर्भात तातडीची बैठक बनवण्यात आली आहे. याबाबत सर्व एक्सपर्टची कमिटी तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
या सर्व संशयित रुग्णांची संपूर्ण माहिती घेऊन त्यावर उपाययोजना काढणार आहोत. सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही. हा संसर्गजन्य आजार नाही. वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. नेहमीची जी ट्रीटमेंट असते, ती ट्रीटमेंट दिली जाते. लवकरात लवकर बरं होणारा हा आजार आहेत. लहान मुलांना दिलेल्या लसीमुळे देखील हा आजार होऊ शकतो. रोग प्रतिकार शक्ती कमी असेल तरीही हा आजार होऊ शकतो, त्यामुळे या आजारामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, असंही डॉ. नीना बोराडे यांनी सांगितलं आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराबाबत सापडलेल्या संशयित रूग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका सतर्क झाली आहे. आज आरोग्य विभागाने यासंदर्भात तातडीची बैठक बोलावली आहे. यावर आढावा घेतला जाणार आहे. नेमकं या आजारावर काय उपाय करता येणार यावर एक्सपर्ट टीम सोबत बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे काय ?
1) गुलेन बॅरी सिंड्रोम नसांवर परिणाम करणारा आजार, आजारामुळे स्नायू कमकुवत होतात.
2) स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात, संवेदना कमी होतात.
3) चेहरा, डोळा, छाती, शरिरातील स्नायूंवर परिणाम, तात्पुरता अर्धांगवायू, श्वसनाचा त्रास
4) हाताची बोटं, पाय यांत वेदना, चालताना समस्या, चिडचिड, चेहऱ्यावर कमजोरी ही प्रमुख लक्षणं