पुणे: पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, तर एक चिंता वाढवणारी बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) रुग्णांच्या संख्येत शनिवारी (ता. 24) वाढ झाली नाही. रुग्णसंख्या 73 वर स्थिर आहे, तर 14 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. दरम्यान, शनिवारी नऊ संशयित रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी (ता. 25) मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पुण्यातच जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत रूग्ण हा डीएसके विश्व धायरी परिसरात राहण्यास होता. त्यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत रूग्ण सनदी लेखापाल (सीए) असून, एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली व भाऊ, असा परिवार आहे. त्यांना 11 जानेवारी रोजी पुण्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. काही कार्यक्रमानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी गेले होते.
सोलापुरात गेल्यानंतर अशक्तपणा जास्त प्रमाणात वाढला. त्यामुळे त्यांना सोलापूरमधील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची अवस्था पाहून डॉक्टरांनी 'जीबीएस' (Guillain Barre Syndrome) झाल्याचे निदान केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची तब्येत स्थिर होती. पण त्यांना हातपाय हलवता येत नव्हते. गेले पाच दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याने शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आलं होतं. मात्र, काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे. तर दुसरीकडे रुग्णालयातील डॉक्टरांनी, "मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांचे शवविच्छेदन केले जाणार आहे", अशी माहिती दिली आहे.
काय काळजी घ्यावी
पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.
कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?
दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.
कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे
अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा उलट्या