Pune Empress Garden : पुण्यातील एम्प्रेस (Empress garden)  या गार्डनमधील वृक्ष शेकडो वर्षं जुने आहेत. या गार्डनमधील सुमारे आठशे वर्ष जुन्या झाडांना आता क्यूआर कोड बसवण्यात आले आहेत. 26 जानेवारीला याची सुरुवात होणार आहे. या क्युआर कोडच्या माध्यमातून वृक्षांची शास्त्रीय माहिती आणि त्यांचा इतिहास इथं येणाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे .  


ब्रिटिश सत्ता पुण्यात स्थिरावत असताना साधारणपणे 1830च्या आसपास या गार्डनची ब्रिटिशांनी निर्मिती केली. सुरुवातीला हे गार्डन सोल्जर गार्डन म्हणून ओळखलं गेलं ज्याचं पुढं एम्प्रेस गार्डन (Empress Garden) झालं . मात्र या ठिकाणी असलेले वृक्ष या गार्डनपेक्षाही जुने आहेत . काही दोनशे वर्षं जुने , काही अडीचशे वर्षं जुने तर काही तीनशे वर्षं जुने आहेत. काही झाडं प्रचंड व्यापलेली आहेत तर वेलींनेही  मोठा परिसर व्यापला आहे. अभ्यासकांच्या मते एक वेल ही तीनशे वर्षांहून अधिक जुनी आहे . या अशा दुर्मिळ वृक्षांची माहिती या वृक्षांवर बसवण्यात आलेल्या अशा क्यूआर कोडच्या सहाय्याने आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


एम्प्रेस गार्डनमध्ये दुर्मिळ वृक्ष (Empress Garden)


पुण्याच्या मध्यवर्ती भागात 45 एकरांमध्ये हे एम्प्रेस गार्डन पसरलं आहे . या 45 एकरांमध्ये देशी आणि विदेशी मिळून साडे आठशे वृक्ष उभे आहेत. यातील बहुतेक वृक्ष शेकडो वर्षं जुने आहेत . एरवी कुठे फारसे न दिसणारे वृक्ष आणि त्यांचे आकार या ठिकाणी पाहायला मिळतात. यातील अनेक वृक्ष शेकडो फूट उंच आहेत. तर काहींच्या फांद्या एकमेकांनामध्ये गुंतून भुलभुलैय्या तयार झाला आहे. या वृक्षांच्या शास्त्रीय माहितीसह इतर माहिती या क्यूआर कोड माध्यमातून इथं येणाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  


हे एम्प्रेस गार्डन म्हणजे एका अर्थाने भारताच्या पश्चिम घाटाची छोटीशी प्रतिकृती आहे. पश्चिम घाटात आढळणाऱ्या वृक्षांच्या बहुतांश प्रजाती इथं जोपासण्यात आल्यात. या वृक्ष प्रजातींची शास्त्रीय नाव आणि त्या नावांमागचा इतिहास तेवढाच रंजक आहे.  वृक्षांचे औषधी गुणधर्म कोणते? ते किती वर्ष जगतात? आणि त्यांना कुठल्या ऋतूत फुलं आणि फळं येतात हे सगळं रंजक पद्धतीने या क्यूआर कोडच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचणार आहे, असं वृक्ष अभ्यासक आणि क्यूआर कोड बसवणाऱ्या टीमचे सदस्य प्राध्यापक श्रीनाथ कवडे यांनी सांगितले. 


26 जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध


या झाडांवर दहा ते बारा फूट उंचीवर हे क्यू आर कोड लावण्यात आलेत . ते लावताना झाडाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. 26 जानेवारीपासून इथं येणारे लोक या  क्यूआर कोडची ही सुविधा वापरू शकणार आहेत . एरवी फक्त  वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांना ज्यामध्ये रस असतो असं या वृक्षांचं जग मोठ्या रंजक पद्धतीनं सर्वसामान्यांसाठी खुलं होणार आहे.