Pune Bypoll election : चिंचवडची पोटनिवडणूक (pune bypoll election)जाहीर झाल्यापासून राहुल कलाटेंची जोरदार चर्चा सुरु आहे आणि आता त्यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यभर चिंचवडची पोटनिवडणूक गाजणार असल्याचं चिन्ह आहे. त्यांच्याविरोधात बॅनरबाजी (Rahul kalate) करण्यात आली आहे शिवाय त्यांची शिवसेनेतून हकालपट्टीदेखील करण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहे. ते आता चिंचवडमधून 'शिट्टी' या चिन्हावर चिंचवड काबीज करायला सज्ज झाले आहे. जनता आणि समर्थकांच्या पाठिंब्यामुळे बंडखोरी करतो असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरीदेखील त्यांच्याकडे निवडणूक लढवण्याइतकं आर्थिक पाठबळ आहे का?, अशा चर्चा आहे. त्यांच्याकडे नेमकी किती संपत्ती आहे? आणि त्यांच्यावर कर्ज किती आहे?, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
राहुल कलाटे यांच्यावर किती कोटींचं कर्ज आहे?
राहुल कलाटे यांच्याकडे 61 कोटींची संपत्ती आहे. त्यावर 1 कोटी 10 लाख 7 हजार 248 रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून यासंदर्भात माहिती मिळाली आहे. राहुल कलाटे यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेतली आहे. कलाटे कुटुंबाची जंगम मालमत्ता एक कोटी 40 लाख 20 हजार 593 आहे. कलाटे यांची स्थावर मालमत्ता 60 कोटी तीन लाख 76 हजार 319 रुपये, तर जंगम स्थावर मालमत्ता 61 कोटी 43 लाख 96 हजार 912 रुपये आहे. कलाटे यांच्यावर 1 कोटी 10 लाख 7 हजार 248 रुपयांचे कर्ज आहे. कलाटे यांनी शेती आणि व्यवसाय हे उत्पन्नाचे साधन दाखवले असून त्यांची पत्नी गृहिणी आहे.
राहुल कलाटे यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
कलाटे यांच्याकडे पुणे जिल्ह्यातील खेड, मुळशी तालुक्यात शेतजमीन आहे, तर रहाटणी, वाकडमध्ये फ्लॅट आहे. कलाटे यांच्याकडे 92 हजार 640 रुपये, तर पत्नीकडे 53 हजार 750 रुपये रोख आहेत. कलाटे यांच्याकडे 15 तोळे सोने, तर त्यांच्या पत्नीकडे 52 तोळे सोनं आणि दोन किलो चांदी आहे. कलाटे यांच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलाटे यांनी 2022-23 या आर्थिक वर्षात 56 लाख 73 हजार 940 रुपये उत्पन्न दाखवले आहे, तर त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 5 लाख 66 हजार 330 रुपये आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात कोणीही उमेदवार उभं राहण्याची हिंम्मत दाखवत नसताना 2019च्या निवडणुकीत राहुल कलाटे हे त्यांच्याविरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना लाखभर मतं मिळाले होते. त्याच जोरावर यावेळी त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.