Pune Bypoll election : चिंचवडनंतर.(pune bypoll election) आता बॅनरबाजीचं लोण कसब्यात येऊन पोहचलं आहे. कसब्याची यावेळची निवडणूक प्रचारांपेक्षाही मतदार संघात लावण्यात आलेल्या बॅनर्समुळे चर्चेत आहेत. कसब्यात अज्ञातांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यात भाजपला निशाण्यावर ठेवून हे बॅनर लावल्याचं बॅनरमधील मजकूरातून स्पष्ट होत आहे.
कसबा हा गाडगीळांचा, कसबा हा बापटांचा, कसबा हा टिळकांचा आणि तोच आमच्याकडून काढला आता आम्ही दाबणार नोटा (NOTA) असे या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे आहे. या बॅनरवर एका बटूचे छायाचित्रही लावण्यात आले आहे. त्यातून योग्य तो संदेश जाईल याची दक्षता घेण्यात आली आहे. सध्या कसब्यात या निनावी लावण्यात आलेल्या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
दिवंगत आमदार मुक्ता टिळकांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही कसब्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे कसब्यातून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र ती उमेदवारी भाजपच्या हेमंत रासने यांना देण्यात आली. त्यानंतर ब्राह्मण समाज नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. पुण्यात भाजपकडून ब्राह्मणांना उमेदवारी देण्यासाठी डावललं जात आहे, अशाही चर्चा रंगल्या. कसब्यातून रासनेंना उमेदवारी मिळाल्याने नाराज असलेल्या ब्राह्मणांनी हे कृत्य केलं असावं, असा अंदाज बांधला जात आहे.
ब्राह्मण समाज नाराजीचं कारण देत कसब्यातून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांना या पोटनिवडणुकीसाठी बासरी हे चिन्ह देण्यात आलं आहे. कसब्यात 13 टक्के मतं ब्राह्मणांची आहे. आतापर्यंत कसब्यात अनेक वर्ष ब्राह्मणांची सत्ता होती. त्यामुळे ही 13 टक्के मतं ब्राह्मणांना मिळत होती. मात्र आता हिंदू महासंघ या पोटनिवडणुकीत उतरले असल्याने ही मतं विभागली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शनदेखील वाढण्याचं चिन्ह दिसत आहे.
टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारल्यावर अशाच प्रकारचा बॅनर शनिवारवाड्याच्या भिंतीला लावण्यात आला होता. त्यावर कुलकर्णीचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदार संघ गेला आात बापटाचा मतदार संघाचा नंबर का?, समाज कुठवर सहन करणार,असा मजकूर त्यावर लिहिण्यात आला होता. या बॅनरचीदेखील शहरात मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता पून्हा एकदा निनावी बॅनर लावण्यात आल्याने आणि तोही काहीसा भाजपविरोधात आशय लिहून लावण्यात आल्याने भाजपच्या नेत्यांची चांगलीच धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. मात्र हे बॅनर कोणी लावले, या सगळ्या चर्चांंना उधाण आलं आहे.