Narayan Rane On Vinayak Raut :  पत्रकार शशिकांत वारिसे मृत्यू प्रकरणावरुन प्रश्न विचारल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच भडकले. या सगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी होऊन सत्य सगळ्यांसमोर येणार आहे, असं ते म्हणाले आहेत. शशिकांत वारिसे  यांच्या मृत्यू प्रकरणावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर आरोप केले आहे. त्यावर  नारायण राणे यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. विनायक राऊत हे काही मोठे नेते नाहीत ते सिंधुदूर्गला लागलेली कीड आहे, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केलं आहे. पुण्यातील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.


पुढे बोलताना ते म्हणाले की, कुठलीही हत्या झाली, अपघात झाला तर तेवढेच प्रश्न विचारायचे का. पुण्यात विकासाचे, सामाजिक कोणतेच विषय नाही आहेत का? पत्रकारांनी कुठलाही विषय आला तर तोच लावून धरायचा का? स्थानिक प्रश्न प्राधान्यांने विचारले पाहीजे. जिकडे जावे तिकडे तोच विषय आहे, काय लावलं हे. चौकशी होत आहे, या प्रकरणात कुणाचे नाव असेल तर तो पाहून घेईल. त्यामुळे कोणावरही दोषारोप करुन काहीही होणार नाही, असं ते म्हणाले. 


विनायक राऊतांचा आरोप काय?


वारिसेंची हत्या घडवून आणली आहे. या प्रकऱणी ज्याला अटक केली आहे. तो गुंडगिरी करणारा आंबेरकर नारायण राणे किंवा निलेश राणेंबरोबर असतो.या सगळ्यांच्या चिथावणीमुळे वारिसेसारख्या पत्रकाराची हत्या करण्याचं षडयंत्र आंबेकरने आखलं, असा आरोप विनायक राऊत यांनी राणेंवर केलेत. 


काय आहे वारिसे मृत्यू प्रकरण?


रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' या वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. काही दिवसापूर्वीच राजापूर येथील पेट्रोल पंपावर त्यांना थार गाडीनं जोरात धडक दिली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रत्नागिरीहून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शशिकांत वारिसे यांचा हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघटनेने केला आहे. रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणात आता कार चालक पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली असून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.