Gautami Patil : नृत्यांगणा आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव अल्वावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झालं आहे. काल पुण्यातील एम्स हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मैदानात मोठ्या जल्लोषात कार्यक्रम पार पडला. मात्र, हॉस्पिटलच्या शेजारीच तिच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिलीच कशी असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. हॉस्पिटलच्या शेजारी 100मीटर पर्यंत सायलेंट झोन असतो असं असताना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. 


पुण्यातील औंध परिसरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्या मैदानात तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याच मैदानाच्या शेजारी एम्स हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत असतात. साधारण कोणत्याही हॉस्पिटलच्या 100 मीटरपर्यंत सायलेंट झोन असतो. या परिसरात हॉर्न वाजवण्याचीदेखील परवानगी दिली जात नाही. मात्र याच मैदानावर औंध गाव विश्वस्त मंडळातर्फे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. 


पडताळणी करुन परवानगी दिली; पोलिसांचा दावा


हॉस्पिटलजवळ कार्यक्रमासाठी परवानगी कशी दिली असं विचारलं असता. या कार्यक्रमासाठी रितसर परवानगी विश्वस्त मंडळाने मागितली होती आणि सर्व चौकशी करुन त्यासोबतच अनेक गोष्टींची पडताळणी करुन कार्यक्रमासाठी परवानगी दिल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कायम राडे बघायला मिळतात मात्र औंधमधील कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. 


'औंध गावात हे मैदान आधी होतं आणि त्यानंतर या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्यात आलं'


गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात कायम गोंधळ होत असतो. हा गोंधळ होऊ नये, यासाठी आयोजक खबरदारी घेत असतात. औंधमध्ये औंधगाव विश्वस्त मंडळाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याच मंडळाला हॉस्पिटल शेजारी गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं योग्य वाटतं का?, असं विचारल्यास त्यांनी गावात कुठेही मोठं मैदान नसल्याचं कारण दिलं आहे. औंधगाव विश्वस्त मंडळाचे योगेश जुनावने म्हणाले की औंध गावात या मैदानासारखं मोठं मैदान नाही. आतापर्यंतच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी पाहता भरपूर प्रमाणात लोक गर्दी करत असतात. त्यामुळे आम्ही हे मैदान कार्यक्रमासाठी निवडलं होतं. मात्र दुसरी बाजू बघितली तर औंध गावात हे मैदान आधी होतं आणि त्यानंतर या ठिकाणी हॉस्पिटल बांधण्यात आलं होतं. त्यामुळे मैदानात कार्यक्रमच नाही तर मुलांच्या टुर्नामेंट्सदेखील आयोजित करता येत नसल्याचं ते म्हणाले.


रुग्णांच्या जीवाशी खेळ...



हॉस्पिटलच्या शेजारी असा गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्याने हॉस्पिटलमधील रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अशा मैदानात पोलिसांनीदेखील परवानगी कशी दिली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.