Pune Devendra Fadnavis :  कर्नाटकचा  पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. देशात फक्त मोदी पॅटर्न चालणार, असं सुचक वक्तव्य उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलं आहे. पुण्यात आज राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारीणी बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की येत्या निवडणुकीत कोणताही पॅटर्न चालणार नाही फक्त मोदी पॅटर्न चालणार आहे. त्यामुळे पुढील सत्ता आपलीच असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. 


ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये 700 पेक्षा कमी मतांनी पडलेल्या जागा पाच आहेत आणि जवळपास 42 जागांमधील पराभव हा 2 हजार ते 3 हजार मतांनी झाली आहे. बुथ सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सगळे एक झाले होते तरीही भाजपने कर्नाटकात चांगली मते मिळवली असल्याचं त्यांनी म्हटले. देशात कर्नाटक पॅटर्न येणार अशी जरी चर्चा केली तरीही येत्या लोकसभेत जास्तीत जास्त जागा कर्नाटकमध्ये निवडून आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


'शिल्लकसेना म्हणत उद्धव ठाकरेंना डिवचलं'



भाजपची आणि शिवसेनेची युती भक्कम आहे. ज्या शिवसेनेने विचाराकरीता सरकार सोडलं. ते भाजपसोबत आहे आणि ज्यांनी खुर्ची,पदासाठी आणि सरकारसाठी विचार सोडले ती शिल्लकसेना फक्त महाविकास आघाडीकडे आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


'पुढील वर्ष महत्वाचं'


2023 चे शेवटचे सहा महिने आणि 2024चे पहिले सहा महिने भाजपसाठी फार महत्वाचे असणार आहे. या दिवसात कोणतीही लालसा मनात न बाळगता भाजपसाठी द्यायचे आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक वर्ष फार महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. 



'अडीच वर्ष विश्वासघाताचं सरकार'


अडीच वर्ष विश्वासघाताचं सरकार होतं. याच सरकारचा विश्वासघातापासून विसर्जनापर्यंतचा प्रवास  सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. खंडेखोरांपासून दाऊतपर्यंत संपर्क असलेल्यांचा मंत्रीमंडळाचा समावेश या सरकारमध्ये पाहिला आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंना काहीच तास मंत्रालयात आल्याचं आपण सगळ्यांनी बघितलं. पोलिसांच्या बदल्यांमध्ये वसुलीचं कामदेखील या सरकारमध्ये पाहिलं असल्याचं ते म्हणाले. 


'नाना पटोलेंना पुरस्कार दिला पाहिजे'



कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर केलेले आरोप त्यांनी खोडून काढले. अंबानीच्या घरापुढचे स्फोटकं मी ठेवल्याचं नाना पटोले म्हणाले त्यासाठी त्यांना मोठा अवॉर्ड दिला पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या माणसांनी सचिन वाझे यांना परत पोलीस दलात घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता. त्यावेळी मी नकार दिला. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यानंतर वाझेंना पोलीस दलात दाखल करुन घेतलं असल्याचा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला आहे.