सासवड : माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभेला रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज (13 मार्च) सासवडमध्ये अजित पवारांवर घणाघाती प्रहार करत बारामती लोकसभेला शड्डू ठोकला. यावेळी त्यांनी अजित पवार यांना नीच, उर्मट असे संबोधत बदला घेणार अशा शब्दात आव्हान दिले. ब्रह्मराक्षस म्हणूनही त्यांनी उल्लेख केला.
अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली
शिवतारे म्हणाले की, बारामती मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदार संघ आहे. ही मालकी कोणाची नाही. यामध्ये 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पवार पवार करण्याऐवजी आपल्याला निश्चितपणे आपला स्वाभिमान जागृत करून लढलं पाहिजे. विशेषत: अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता, तो राजकारणाचा एक भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. मी वैयक्तिक नव्हतो. परंतु अजित पवारांनी सभ्यतेची सगळी नीच पातळी गाठली. मी 23 दिवस लीलावतीमध्ये अॅडमिट होतो. मला बायपास करायला सांगितली. स्टेन टाकल्या फेल झाले आणि मी संपूर्ण कार्डिअॅक अॅम्ब्युलन्समध्ये माझा प्रचार झाला. अजित पवारांनी पालखी तळावर सांगितलं, मरायला लागलाय तर कशाला निवडणूक लढवताय. खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी अॅम्ब्युलन्समधून प्रचार केला. तुम्ही खोटं बोलत आहात, लोकांची साथ घेण्यासाठी हे खोटं चाललेले काम तुमचं आहे. माझ्या गाडीपर्यंत पोहोचले, कुणाची आहे, नंबर काढला इतक्या खालच्या थरावर अजित पवार आले.
तर कुठेतरी जावंच लागेल
ते म्हणाले की, तू कसा पुढे निवडून येतो तेच मी आता बघतो. महाराष्ट्रभरामध्ये मी कुणाला पाडायचं ठरवलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही, पाडतोच. राजकारणामध्ये एखाद्याला निवडून आणण्याची पॉझिटिव प्रवृत्ती असावी. गाव बसवायला अनेक लोक लागतात, गाव पेटवायला नालायक माणूस लागतो. त्यांना मी माफ केले होते, महायुती झाल्यानंतर. पण गुर्मी तशीच होती. त्यांचा उर्मटपणा कायम होता. म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाहीत असे लोकांनी सांगितले. पवारांच्या विरोधातली मते आहेत. लोकांचा घात होतोय असं कळले. लोक म्हणायला लागले, सुनेत्रा आणि सुप्रिया आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत, म्हणून आम्ही सुप्रिया सुळेंना मतदान करु असे लोक म्हणायला लागले. लोक म्हणाले, एका बाजूला एक लांडगा आहे आणि एक वाघ आहे तर कुठेतरी जावंच लागेल. त्यापेक्षा सुप्रिया सुळेंना देऊ अशी लोकांची भावना आहे. बारामतीत 6, 80,000 मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे, पण 5 लाख 80 हजार मतदान हे विरोधात आहे.
या लढाईमध्ये जनता प्रचंड आशीर्वाद देईल
लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला आहे त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल, तर आपल्याला आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल, तर मतदान करावं लागेल. अंबानींना एक मत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा लोकशाहीमध्ये तेवढाच मताचा अधिकार आहे. ही लढाई विजय शिवतारेंची नाही, ही लढाई मला खासदार होण्यासाठी नाही. आमदार, म्हणून खासदार म्हणून मला देवाने सगळं दिलं आहे. लोकांची लढाई लढण्यासाठी प्रस्थापितांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आहे. म्हणून ही लढाई लढत आहे. या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल.
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे
मी महायुतीच्या विरोधात नाही. शंभर टक्के मी महायुतीचा शिंदे साहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना गुरु म्हणणारा माणूस आहे, नरेंद्र मोदींची निष्ठा मानणारा माणूस असून याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे, लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे म्हणून या विचारांचा मी आहे. परंतु इथली लढाई ही वेगळी आहे. एक तरी आपल्याकडे ब्रह्मराक्षस आहे आणि लोकांची इच्छा आहे, माझी इच्छा नव्हती अचानकपणे करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येत आहे. नमो विचार मंच या नावाखाली ही निवडणूक लढणार आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे. बारामतीतील ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ.
इतर महत्वाच्या बातम्या