Pune Police Bitcoin case : काही वर्षापूर्वी पुण्यात गाजलेल्या बिटकॉइन घोटाळ्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ज्या सायबर एक्सपर्टने पुणे पोलिसांना दहा गुंतागुंतीचा गुन्हा सोडवण्यासाठी मदत केली होती, त्यानेच बिटकॉइनमध्ये घोटाळा केल्याचं निष्पन्न झाले आहे. आरोपींच्या खात्यात असणारे बिटकॉइन पोलिसांच्या नकळत स्वतःच्या खात्यात वळते केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणी सायबर एक्सपर्ट पंकज घोडे आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेला आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे दोघे ही तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचे अत्यंत निकटवर्तीय होते.


2018 मध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात बिटकॉईन चलनामध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने असंख्य नागरीकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी दत्तवाडी व निगडी पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. संबंधित गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून केले जात आहे. मात्र, बिटकॉईनचा हा नवा गुन्हा असल्याने, तसेच त्याच्या तांत्रिक तपासासाठी आरोपींची मालमत्ता जप्त करण्यासाठी सायबर पोलिसांनी सायबर तज्ज्ञांची मदत घेतली होती. त्यामध्ये "ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशन'चा पंकज घोडे व "के. पी. एम. जी'च्या रविंद्र पाटील या दोघांची पोलिसांनी सायबर तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती.


या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असलेल्या अमित भारव्दाज याच्यासह 17 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून 241 बिटकॉईन जप्त केले होते. मात्र या प्रकरणाच्या तपासात मिळालेल्या वॉलेटच्या माहितीवरून सायबर एक्स्पर्ट असलेल्या रवी पाटील यांनी पोलिसांचीच फसवणूक करीत स्वतःच्या नावावर 60 पेक्षा जास्त बिटकॉईन केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संबंधित आरोपीने "आयपीएस' पदाचा राजीनामा देऊन सायबर तज्ज्ञ म्हणून कामाला सुरुवात केली होती. पंकज प्रकाश घोडे (रा. ताडीवाला रोड), रवींद्र प्रभाकर पाटील (रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आरोपी पंकज घोडे हा तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा निकटवर्ती होता..त्यामुळे सायबर पोलिस ठाण्याच्या तत्कालिन पोलिस अधिकाऱ्यांनी बिटकॉईनसंबंधीचा महत्वपुर्ण डाटा विश्‍वासाने घोडे व पाटील यांच्याकडे तपासासाठी दिला होता. असे असतानाही त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. पाटीलने एका आरोपीच्या वॉलेटमधील बिटकॉईन स्वत:च्या वॉलेटमध्ये वर्ग करून घेतल्याचे पोलिसांना आढळून आले. पंकज घोडे हा त्या दरम्यान रश्मी शुक्ला यांचा अत्यंत विश्वासू म्हणून पोलीस आयुक्तालयात वावरायचा आणि तेव्हाच वॉलेटचे खोटे स्क्रीन शॉट खरे असल्याचे भासवून त्याने 100 bitcoin स्वतःच्या वॉलेट मध्ये टाकून घेतले होते.  


दरम्यान या गुन्ह्यात तेव्हा पोलिसांना मदत करणारे पंकज घोडे आणि रवी पाटील रश्मी शुक्ला यांचे अत्यंत विश्वासू समजले जात होते. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांच्यावर त्यांच्यासोबतच गुन्ह्याचा तपास ही सुरू होता.. मात्र त्यांनीच पोलीस दलाची फसवणूक केल्याने सर्वांना धक्का बसला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणी पोलिस अधिकारी सहभागी आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.