Pune Dog Opration: स्मॉल अ‍ॅनिमल क्लिनिकचे पशुवैद्यकीय शल्यचिकित्सक डॉ. नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 12.5 वर्षांच्या मिलो नावाच्या कुत्र्याच्या खांद्याच्या आणि छातीच्या भागातून 3-4 किलो म्हणजे फुटबाँलच्या आकाराची गाठ काढली. एक मोठी शस्त्रक्रिया करत त्यांनी  ही गाठ काढली आहे.  मिलो नावाचा हा कुत्रा शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 6 तासांत बरा झाला असून अगदी 48 तासात तो पुर्वीसारखा फिरू शकत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.



मिलो हा 12.5 वर्षांचा आहे. त्याच्या रोजच्या कामात फार अडचणी जाणवत होत्या त्यामुळे त्याचे मालक असलेले  बाजवा कुटुंब चिंताग्रस्त झाले. मिलोचे वय लक्षात घेता, त्याला ताप आणि मागच्या पायातील हिप डिसप्लेसिया यांसारख्या आरोग्याच्या अनेक समस्या आहेत आणि तो फक्त आधाराने चालू शकतो. त्याच्यावर हिप डिस्प्लेसियासाठी पीआरपी थेरपीने उपचार करण्यात आले आणि तो बरा झाला. त्याच्या शरीरातील गाठ गेल्या 3 वर्षांपासून नोड्यूलच्या (अगदी लहान) आकारासारखी होती आणि त्यामुळे कोणतीही समस्या उद्भवली नाही. गेल्या वर्षी बायोप्सी केली मात्र त्याचा काहीच फरक पडताना दिसत नव्हतं.  हळूहळू ही गाठ वाढत होती आणि ती फुटबाँल सारखी दिसू लागली. मिलोवर वेळेवर शस्त्रक्रिया केल्याने आता मिलो एकदम ठणठणीत पुर्वीसारखा वावरू लागला  अशी प्रतिक्रिया मिलो या पाळीव प्राण्याचे पालक सुषमा बाजवा यांनी व्यक्त केली.


मोठ्या फॅटी ट्यूमरमुळे मिलोला गंभीर अस्वस्थता होती. 3-4 किलोच्या मोठ्या ट्युमरमुळे त्याला उठता आणि चालता येत नव्हते. शरीरात मेटास्टॅसिस झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही छातीचा एक्स-रे  आणि बायोप्सी केली. जर तो कर्करोग असता तर तो शरीराच्या इतर भागात पसरला असता.  मात्र तसं नसून हा ट्युमर चरबीच्या पेशींनी बनलेले आढळून आले. कुत्र्यांमध्ये लिपोमाचे कोणतेही निश्चित कारण नाही आणि ते वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. हे कुत्र्याच्या (किंवा आत) किंवा पोटावर आणि छातीवर जवळजवळ कोणत्याही ठिकाणी आढळू शकते, असं डॉक्टरांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


सामान्यत: मोठा ट्युमर 6 ते 8 इंच कापून काढावा लागतो. मात्र आम्ही फक्त 1.5 सेमी कापून ट्यूमर काढण्यासाठी मॉर्सेलेटर वापरून कार्बनडाय आॅक्साईड इन्सुफ्लेटर वापरून एक दुर्मिळ मिनिमली इनवेसिव्ह लिपोमा शस्त्रक्रिया केली. अशा प्रकारची लिपोमा काढण्याची  लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आतापर्यंत कोणत्याही मनुष्यात किंवा कुत्र्यांमध्ये केली गेली नाही. कार्बनडाय आॅक्साईड इन्सुफ्लेटर वापरून शरीरात प्रवेश करण्यासाठी लॅप्रोरोस्कोपचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेत 3-4 किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. ही प्रक्रिया 20 मिनिटे चालली. त्यानंतर मिलो 6 तासांत बरा झाला. पुन्हा स्वतःच्या पायावर उभा राहीला.