पुणे : पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हल मागच्या अडचणी काही केल्या दूर होताना दिसत नाहीत. सनबर्नमध्ये दारुचे पेग देताना ठरलेल्या मापापेक्षा कमी दिल्यानं आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फेस्टिव्हलमध्ये पाण्याची बाटलीही 50 ते 100 रुपयांना विकल्याची तक्रार वैधमापन विभागाकडे दाखल झाली आहे. तक्रारीनंतर वैधमापन विभागानं सनबर्नमध्ये जाऊन पडताळणी केली असता तक्रारींमध्ये तथ्य आढळलं. त्यानंतर सनबर्नवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

आधीच्या अडचणीत भर

विनापरवाना डोंगराचं सपाटीकरण केल्याने, सनबर्न फेस्टिव्हलला तब्बल 62 लाखांचा दंड ठोठावला होता. हवेली तालुक्याच्या प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी ही कारवाई केली. तसंच दंडाची रक्कम तातडीने भरण्याचे आदेशही ज्योती कदम यांनी दिले आहेत.

सनबर्न फेस्टिव्हलसाठी केसनंद गावातील डोंगराचं मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं. यासाठी तहसीलदार किंवा जिल्हा खनिकर्म विभागाची परवानगी आवश्यक होतं. पण आयोजकांकडून सपाटीकरणासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रांताधिकाऱ्यांनी आयोजकांना दणका दिला.

केसनंद परिसरात डोंगराचं सपाटीकरण, मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली आहे. त्यामुळे त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

सनबर्नकडून 1 कोटी 77 लाखांचा करमणूक कर

सरकारने आयोजकांकडून करमणूक करापोटी 1 कोटी 77 लाख रुपयांची वसुली केली आहे. आयोजकांनी 1 कोटीचा डीडी आणि 77 लाखाची रोकड जिल्हा करमणूक कर विभागाकडे जमा केली आहे.

सनबर्न फेस्टिव्हल म्हणजे काय?


28 ते 31 डिसेंबरदरम्यान पुण्याजवळील केसनंदमध्ये सनबर्न फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. सनबर्न हा पूर्णत: व्यावसायिक ईडीएम अर्थात इलेक्ट्रिक डान्स म्युझिक फेस्टिव्हल आहे. ईडीएम यावरुनच हा फेस्टिव्हल कसा असेल, याचा अंदाज बांधता येईल.

डीजेचा ठोका, चकाकणारं लाईटिंग आणि बेधुंद तरुणाई असं थोडक्यात वर्णन या सनबर्न फेस्टिव्हलचं करता येईल. हा आशियातील सर्वात मोठा, तर जगातील पहिल्या 10 फेस्टिव्हल्सपैकी एक म्युझिक फेस्टिव्हल असल्याचा दावा करण्यात येतो.

वेगवेगळ्या रंगात, वेगवेगळ्या ढंगात, ‘बेफिक्रे’ तरुणाई बेभान होऊन यात सहभागी होतात.  बिनधास्त डान्स, रापचिक म्युझिक आणि धुंदी आणणाऱ्या लाईट्समुळे हा फेस्टिव्हल परिचित आहे.

या फेस्टिव्हलमध्ये केवळ म्युझिक आणि डान्स नाही तर विविध कला, खान-पान, थरारक गेम्स, कलाकुसर, हस्तकलांचा मेळा इथे भरतो.  त्यामुळे इथे यायचं आणि इथलंच होऊन जायचं, असं आयोजन करण्यात येतं.

सनबर्न फेस्टिव्हलचा इतिहास

सनबर्न फेस्टिव्हलचं हे पहिलंच वर्ष नाही. गेल्या 9 वर्षापासून म्हणजेच 2007 पासून गोव्यात हा फेस्टिव्हल सुरु आहे. दरवर्षी इयर एण्डिंगला या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. गोव्यात रुळलेला हा फेस्टिव्हल यंदा पहिल्यांदाच गोव्याबाहेर हलवण्यात आला आहे.

निखिल चिनापा

‘गॉडफादर ऑफ डान्स म्युझिक’ आणि MTV वरील ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्स व्हिला’चा अँकर निखील चिनापाने  सर्वात आधी सनबर्न फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.

संबंधित बातम्या :


'सनबर्न'ला आणखी एक दणका, दंडाची रक्कम 1 कोटींवर


सनबर्न फेस्टिव्हलला 62 लाखांचा दंड


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा!


पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला 'सनातन'चा विरोध