पिंपरी चिंचवड : भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामेसासऱ्यानं जावयाची निर्घृण हत्या केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये ही धक्कादायक घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. सागर कवितके असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मामेसासरा सतीश ठोंबरेला अटक केली आहे.
सहा महिन्यांपूर्वी सागरने सतीश ठोंबरेच्या भाचीशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला माहेरच्या मंडळीचा विरोध होता, हा विरोध अद्यापही कायम होता. सासऱ्यांनी दुसऱ्या मुलीच्या लग्नपत्रिकेत जावयाच्या नावाचा उल्लेख टाळला आणि लग्नाला न बोलावून राग व्यक्त केला.
संतापलेला सागर सासऱ्यांना जाब विचारण्यासाठी गेला असताना तिथं पत्नीनं मामा मानलेल्या सतीश ठोंबरेसोबत त्याचे खटके उडाले. त्यानंतर सतीश ठोंबरेने सागरची समजूत काढण्याच्या बहाण्याने त्याला गाडीत घातलं आणि निगडीहून पिंपरी परिसरात आणलं.
तिथं पुन्हा दोघांत वाद झाले आणि सतीशने सागरच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. सागरचा मृत्यू झाल्यानंतर सतीशने उस्मानाबादच्या जामखेडला मृतदेह नेला. हत्येनंतर आरोपीनं मृतदेह उस्मानाबादला नेला. मात्र निगडी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं तपास करत 7 डिसेंबरला झालेल्या हत्येचा छडा लावला आहे.